विशाखापट्टणम कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल, दोन खेळाडूंचं पदार्पण, अशी आहे प्लेईंग XI

IND Vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये  (Visakhapatnam Test) खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला. या धक्क्यातून सावरत असतानाच दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) आणखी दोन धक्के बसले. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. तर विराट कोहली आणि मोहम्मद शमी याआधीच मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे विशाखापट्टणम कसोटी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर प्लेईंग इलेव्हन निवडण्याचं आव्हान असणार आहे. 

अशी असेल प्लेईंग इलेव्हन

दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियात युवा सर्फराज खान (Sarfraz Khan) आणि रजत पाटीदार (Rajat Patidar) यांचं पदार्पण होण्याची शक्यता आहे. याशिवाय कुलदीप यादवला विशाखापट्टणम कसोटी खेळण्याची संघी मिळू शकते. पहिल्या कसोटी सामन्यात समाधानकारक कामगिरी करु न शकलेल्या मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटीतून डच्चू मिळू शकतो. 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीचं पितळ उघडं पडलं. विजयासाठी 231 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत एकही सिनिअर खेळाडू नाही. त्यातच आता दुसऱ्या कसोटीतून केएल राहुल बाहेर पडल्याने मधली फळी आणकी कमकुवत झाली आहे. केएल राहुलच्या जागी युवा रजत पाटीदारला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच फलंदाजी मजबूत करण्यासाठी सर्फराज खानलाही संधी मिळू शकते. 

सर्फराज खान आणि रजत पाटीदारला संधी मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर आऊट ऑफ फॉर्म आहेत. पण दुसऱ्या कसोटीसाठी गिल आणि अय्यरला संधी देण्याशिवाय रोहित शर्माकडे पर्याय नाही. 

गोलंदाजीत बदल होणार?

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या गोलंदाजीतही बदल होण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणमची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया केवळ एक वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हैदराबाद कसोटीत जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे संघात त्याची जागा निश्चित आहे. याशिवाय आर अश्विन आणि अक्षर पटेल फिरकीची जबाबदारी सांभाळलतील. त्यांना कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) साथ मिळेल. 

2024-01-30T14:17:49Z dg43tfdfdgfd