धरमशाला: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तो फक्त धावा करत नसून त्याची बॅट जणू तळपताना दिसत आहे. विशेषतः अलीकडच्या काळात रोहितने खेळण्याची पद्धतही बदलली आहे. तो सुरुवातीला आल्यावर आधी मैदानात सेट व्हायचा आणि मग झटपट डाव खेळायचा. पण आता हिटमन पहिल्याच षटकापासून शानदार फटकेबाजी करत होता. या संपूर्ण विश्वचषकात आतापर्यंत हे दिसून आले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या धरमशालामध्येही रोहित शर्माने संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. येताच त्याने चौकार आणि षटकार मारले. हिटमॅनने ४६ धावांच्या छोट्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकारही मारले. यासह त्याने एक खास विक्रम केला. या विक्रमासह त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे. त्याच बरोबर सचिन तेंडुलकर, विराट कोहली सारखे हिरो देखील हे काम करू शकलेले नाहीत.
रोहित शर्माने केला मोठा विक्रम
रोहित शर्मा लांबलचक षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. या दमदार षटकारांसह त्याने एक नवा विक्रम केला आहे. या कॅलेंडर वर्षात हिटमॅनने आतापर्यंत ५१ षटकार मारले आहेत. एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता तिसरा आला आहे. त्याने शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे.
शाहिदने २००२ च्या कॅलेंडर वर्षात ४८ षटकार मारले होते. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने २०१५ मध्ये ५८ षटकार मारले होते. या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल, ज्याने २०१९ मध्ये ५६ षटकार ठोकले. आता तर हिटमॅनही त्यांच्यापासून दूर नाही. तो लवकरच एबीडी आणि गेलचा हा विक्रम मोडीत काढू शकतो.
याशिवाय भारत-न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलायचे तर, रविवारी धरमशाला येथे झालेल्या आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाने २० वर्षांनंतर किवी संघाचा पराभव केला आहे. रोहित सेनेने हा सामना ४ गडी राखून जिंकला. या विजयासह तो गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आहे.
2023-10-23T06:38:32Z dg43tfdfdgfd