RAVI BISHNOI: भारताच्या विजयापेक्षा रवी बिश्नोईच्या पराक्रमाचीच चर्चा, आता पुन्हा काय केलं जाणून घ्या...

हरारे : रवी बिश्नोईचं चालंलय तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. कारण झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात रवीने अफलातून झेल पकडला होता. त्यानंतर आता चौथ्या टी २० सामन्यात कोणालाही विश्वास बसणार नाही, अशी गोष्ट करून दाखवली आहे. या सामन्यात भारताने १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. पण रवीला यावेळी भारतीय खेळाडूंनी डोक्यावरच घेतले.

ही गोष्ट घडली ती १५ व्या षटकात. यावेळी रवी बिश्नोईच गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा हा फलंदाजी करत होता. रवीने यावेळी असा चेंडू टाकला की त्याची तोड ही सिकंदरकडे नव्हती. हा चेंडू सिकंदरला समजलाच नाही. त्यामुळे त्याने हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. पण हा चेंडू जास्त लांब गेला नाही त्यावेळी झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण रवीची चेंडूवर बारीक नजर होती. रवी त्या चेंडूकडे जलदगतीने धावला आणि तो चेंडू पकडला. त्यावेळी झिम्बाम्बेच्या फलंदाजांना कळलं की, आता ही धाव काही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. पण रवीने यावेळी धावत चेंडू पकडला आणि थेट स्टम्पवर मारत विकेट मिळवून दिली. गोलंदाजी केल्यावर धावत जाऊन चेंडू पकडणे सोपे नसते. पण रवीने तो चेंडू पकडला नाही तर थेट स्टम्पवरही मारला. त्यामुळेच भारताच्या खेळाडूंनी त्याचे कौतुक केले.

रवी बिश्नोई हा अप्रतिम फिरकी गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने भल्या भल्या फलंदाजांना नाचवले आहे. पण यावेळी फलंदाजांंना नाचवत नाही तर एक भन्नाट काम करत त्याने हा पराक्रम केला आहे. जेव्हा बिश्नोईने मैदानात ही गोष्ट केली तेव्हा कोणालाही प्रथम विश्वास बसला नव्हता. पण जेव्हा निकाल समोर आला तेव्हा मात्र रवीचे भारतीय खेळाडूंनी जोरदार अभिनंदन केले.

रवी बिश्नोईला या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही. पण त्याने केलेला हा रन आऊट कोणीही विसरू शकणार नाही.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-13T15:53:39Z dg43tfdfdgfd