T-20 विश्वकाचषकानंतर ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचा विजयी तिरंगा फडकणार? द्रविडने मोदींना दिलेले वचन चर्चेत

टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून भारतीय खेळाडू मायदेशी परतले. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या खेळाडूंव्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या यशासोबतच पीएम मोदींनी इतर खेळांच्या सुधारणेवरही चर्चा केली. याशिवाय पंतप्रधान मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ वर वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि क्रिकेटमधील टीम इंडियाच्या आशांबद्दल विचारले असता, राहुल द्रविड म्हणाले की ऑलिम्पिकमध्ये खेळणे ही क्रिकेटपटूंसाठी मोठी गोष्ट असेल. तसेच देश आणि बोर्डासाठी एक उपलब्धी असेल. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे ही अभिमानाची बाब असेल. मला आशा आहे की या संघातील अनेक खेळाडू ऑलिम्पिक २०२८ चा भाग असतील. अनेक युवा खेळाडू असतील, परंतु आमची नजर सुवर्ण जिंकण्यावर असेल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसह क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. गेल्या १०० वर्षांपासून क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग नाही.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, सर्वप्रथम, आम्हाला भेटण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. नोव्हेंबरमध्ये (गेल्या वर्षी) आम्ही अहमदाबादमध्ये हरलो, तेव्हा तुम्ही तिथे आलात, तेव्हा आमच्यासाठी कठीण होते; आणि आज अशा आनंदाच्या प्रसंगी आम्ही तुम्हाला भेटू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की रोहित आणि मुलांनी जबरदस्त लढाईची भावना दाखवली. सर्व श्रेय पोरांना, त्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली. २०११ च्या विजयाने जशी प्रेरणा मिळाली तशीच या मुलांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे. मला फक्त मुलांचे अभिनंदन करायचे आहे,” असं द्रविड म्हणाला.

दरम्यान गुरुवारी सकाळी ६ वाजता भारतीय खेळाडू बार्बाडोसहून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचवेळी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईत भारतीय खेळाडूंची विजयी यात्रा सुरू झाली. या परेडमध्ये लाखो लोक रस्त्यावर आले होते. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता. अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक विजेता ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-05T13:51:23Z dg43tfdfdgfd