T20 WORLD CUP FINALS: टी-२० वर्ल्डकप फायनलचा इतिहास सांगतो, ज्या संघाने टॉस जिंकला त्यांनी कधीच...

बार्बोडोस: गेल्या १२ महिन्यात तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेची फायनल खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने ब्रिजटाउन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणार असल्याचे सांगितले.

टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या बार्बोडोस येथे सुरू असलेल्या फायनल मॅचच्या आधी ८ फायनल झाल्या आहेत. या आठ पैकी ७ वेळा ज्या संघाने टॉस जिंकला त्यांनीच विजेतेपद देखील मिळवले आहे. यातील गेल्या ६ टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये ज्या संघाने टॉस जिंकला त्यांनी विजय मिळवला. टी-२० वर्ल्डकपमधील ही आकडेवारी भारतीय संघाच्या बाजूने झुकणारी आहे. आज रोहितने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला असून पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभा करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

दुसऱ्या डावात धावांचा पाठला करताना अंतिम सामन्यात ६ वेळा विजय मिळवला आहे. २०१० नंतर प्रथमच टी-२० वर्ल्डकपची फायनल दिवसा होत आहे.

केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर या वर्ल्डकपमध्ये झालेल्या ९ पैकी ३ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या तर ३ वेळा दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवलाय. एक मॅच टाय झाली तर अन्य एका मॅचचा निकाल लागला नाही. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५० असून दिवसा होणाऱ्या मॅचसाठी १६३ ही सरासरी धावसंख्या आहे. भारतीय संघाने या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध १८१ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध २०१ धावा केल्या होत्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात मात्र खराब झाली आहे. दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा फक्त ९ धावांवर बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये सहाव्या चेंडूवर ऋषभ पंत शून्यावर माघारी परतला. तर पाचव्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव फक्त ३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T15:27:59Z dg43tfdfdgfd