एकच वादा सूर्या दादा, मुंबईने दमदार विजयासह घेतला पराभवाचा बदला...

मुंबई : सूर्याकुमार यादवने धडाकेबाज फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सच्या संघाला दमदार विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबई इंडियन्सने आपल्या पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. मुंबईच्या संघाने धावांचा रतीब घालणाऱ्या हैदराबादच्या संघाला १७३ धावांत रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सुरुवातीलाच तीन धक्के बसले. पण त्यानंतर सूर्याने संघाला सावरले आणि शतकासह संघाला सात विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सूर्याने यावेळी ५१ चेंडूंत १२ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद १०२ धावा करत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

हैदराबादच्या १७४ धावांच्या आव्हानाचा करताना मुंबईचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले. मुंबईला पहिला धक्का ईशान किशनच्या रुपात बसला, त्याला ९ धावाच करता आल्या. त्यानंतर रोहित शर्मा चार धावांवर बाद झाला. नमन धीरला तर यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे मुंबईच्या संघाची ३ बाद ३१ अशी अवस्था झाली होती आणि हैदराबादने मुंबईला पिछाडीवर ढकलले होते. पण त्यानंतर सूर्याने तुफानी फटकेबाजी करत संघाला सावरले. सूर्याला यावेळी चांगली साथ मिळाली ती तिलक वर्माची. सूर्या आणि तिलक या उजव्या आणि डाव्या फलंदाजांच्या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि संघाला विजयपथावर आणले.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली. हार्दिकचा हा निर्णय किती योग्य आहे हे मुंबईच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. हैदराबादच्या संघाने यावेळी ५६ धावांची दमदार सलामी दिली. पण ट्रेव्हिस हेड ४८ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. अखेरच्या षटकांमध्ये हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने १७ चेंडूंत ३५ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच हैदराबादच्या संघाला २० षटकांत १७३ धावा करता आल्या.

मुंबईकडून यावेळी कर्णधार हार्दिक पंड्या आणि पीयुष चावला यांनी दमदार गोलंदाजी केली. हार्दिक आणि पीयुष यांनी यावेळी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळेच मुंबईला हैदराबादच्या धावसंख्येला लगाम लावता आला. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजने एक विकेटस मिळवली. यावेळी मुंबईकडून सर्वात भेदक गोलंदाजी केली ती जसप्रीत बुमराहने चार षटकांत फक्त २३ धावा देत एक विकेट मिळवली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-06T18:07:51Z dg43tfdfdgfd