कुलदी‌प आणि जेक फ्रेझरच्या झंझावाती खेळीने लखनौ चितपट, दिल्लीचा ६ विकेट्सने विजय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग- आयपीएलच्या १७व्या सीजनमध्ये २६व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला. लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी १२ एप्रिल रोजी झालेल्या या सामन्यात दिल्लीला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य होते, ते संघाने १८.१ षटकात पूर्ण केले. आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सवर दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला विजय आहे.

यापूर्वी दिल्लीचा लखनौविरुद्ध सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. त्याशिवाय, लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध १६० किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा दिल्ली हा पहिला संघ ठरला आहे.

जेक फ्रेझर-मॅकगर्क दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो ठरला. जेकने आपला पहिला आयपीएल सामना खेळताना ३५ चेंडूत ५५ धावांची खेळी खेळली, ज्यात पाच षटकार आणि दोन चौकार मारले. जेक आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी झाली, त्यामुळे लखनौचा विजय जवळपास ठरला होता. पंतने २४ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांसह ४१ धावा केल्या. पृथ्वी शॉनेही ३२ धावांची खेळी खेळली.

लखनौच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेत ७ विकेट गमावत १६७ धावा केल्या. लखनौकडून आयुष बडोनीने ५५ धावांची नाबाद खेळी खेळली. आयुषने ३५ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. आयुषसह अर्शद खानने आठव्या विकेटसाठी ७३ धावांची नाबाद भागीदारी केली, त्यामुळेच लखनौना मोठी खेळी करता आली. कर्णधार केएल राहुलनेही ३९ धावांचं, तर क्विंटन डी कॉकने १९ धावा केल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-12T18:42:59Z dg43tfdfdgfd