केकेआरचे २४ कोटी पाण्यात; गोलंदाजानेही धुतलं, मात्र नशिबाने वाचवलं, स्टार्ककडून नाराजीचं सत्र कायम

दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी आयपीएल २०२४ च्या ३६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १ धावाने पराभव केला. केकेआर संघाने प्रथमच आयपीएलमध्ये एका धावेने विजय मिळवला आहे. कोलकाताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत ६ विकेट्सवर २२२ धावा केल्या आणि त्यानंतर बेंगळुरूला २२१ धावांवर आटोपले. शेवटच्या दोन षटकात बेंगळुरूला विजयासाठी ३१ धावांची गरज होती आणि दिनेश कार्तिक क्रीजवर होता. पण आंद्रे रसेलने १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कार्तिकला बाद करत सामना कोलकात्याच्या दिशेने वळवला. यानंतर शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी २१ धावा करायच्या होत्या.

मिचेल स्टार्कच्या नावावर लज्जास्पद विक्रम

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटची ओव्हर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला दिला. पण स्टार्कने कर्ण शर्माच्या षटकात तीन षटकार मारले आणि कोलकाता आता सामना हरणार असे वाटत होते. पण कर्ण बाद होताच सामना पुन्हा उलटला. स्टार्कने आपल्या तीन षटकांत ५५ धावा दिल्या आणि त्याला एकच यश मिळाले. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात स्टार्कने आपल्या स्पेलमध्ये एकूण सात षटकार ठोकले आणि यासह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या स्टार्कच्या नावावर लज्जास्पद विक्रम जमा झाला. आयपीएलच्या एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टार्क आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

मिचेल स्टार्कच्या शेवटच्या षटकाचा थरार

या सामन्यातील शेवटची ओव्हर मिचेल स्टार्कने टाकली. मिचेल स्टार्कच्या समोर कर्ण शर्मा होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्ण शर्माने षटकार खेचला. त्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंसह चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. तर तिसऱ्या चेंडूवर कर्ण शर्माने जोरदार षटकार खेचला. स्टार्कने शर्माला चौथा चेंडू टाकला. या चेंडूवरही कर्ण शर्माने अप्रतिम षटकार मारला. आता २ चेंडूत ३ धावांची गरज होती. या षटकारानंतर केकेआरच्या खेळाडूंना टेन्शन आल्याचं दिसून आलं. मात्र नशिबानं स्टार्क वाचवलं. त्याने शर्माला या षटकाचा पाचवा चेंडू टाकला. त्यावर कर्ण शर्मा आऊट झाला. यामुळे केकेआरला दिलासा मिळाली अन् इथेच सामना फिरला. त्यानंतर एका चेंडूवर तीन धावांची गरज असताना लॉकी फर्ग्यूसन क्रिजवर आला. मात्र शेवटच्या चेंडूवर १ धाव घेत तो धावबाद झाला. यामुळे सामना केकेआरने जिंकला.

मात्र मिचेल स्टार्कने आजच्या सामन्यातही निराशाच केली आहे. आयपीएल मेगा लिलावात कोलकाताने यावेळी स्टार्कला २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने आतापर्यंतच्या कामगिरीने निराश केले आहे. या हंगामात त्याने १० पेक्षा जास्त इकॉनॉमीवर धावा दिल्या आहेत.

मिचेल स्टार्कची आयपीएल २०२४ मधील आतापर्यंतची कामगिरी

०/५३ वि एसआरएच

०/४७ वि आरसीबी

२/२५ वि डीसी

०/२९ वि सीएसके

३/२८ वि एलएसजी

०/५० वि आरआर

१/५५ वि आरसीबी

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-21T16:30:14Z dg43tfdfdgfd