चहाची टपरी चालवली, अंडी विकली, कोरोनात व्यवसाय बुडाला... मयंकच्या वडिलांचा संघर्ष

IPL 2024 : आयपीएल 2024 आतापर्यंत 15 सामने झाले आहेत. काही सामन्यात फलंदाजांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली तर काही सामन्यात गोलंदाजांची आक्रमकता दिसली. पण या सर्वात क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं ते लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) युवा गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav). आपल्या वेगवान गोलंदाजीने मयंक यादव यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाजांचा कर्दनकाळ बनला आहे. केवळ मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही मयंक यादव ट्रेंडमध्ये आहे. 

टीम इंडियाचं भविष्य

मयंक यादवचा वेग आणि अचूक टप्पा पाहून अनेक दिग्गज क्रिकेटर्सने मयंक यादव भारतीय क्रिकेटचं भविष्य असल्याचं म्हटलं आहे. करोडो भारतीयांच्या तोंडावर सध्या मयंक यादवचंच नाव आहे. मयंक यादवच्या या यशामागे त्याच्या वडिलांचा मोठा संघर्ष आहे. मयंकच्या वडिलांचं नाव प्रभू यादव  (Prabhu Yadav) असं आहे. प्रभू यादव यांचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं. पण आर्थिक परिस्थिती आणि जबाबदारीमुळे ते हे स्वप्न पूर्ण करु शकले नाहीत. पण आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत केली. 

मयंकच्या वडिलांचा संघर्ष

मयंकचे वडिल प्रभू यादव यांनी नुकतीच एका न्यूज वेबसाईटला मुलाखत दिली. यात त्यांनी आपल्या संघर्षाची माहिती दिली. प्रभू यादव यांचं लहानपणापासून क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं. पण घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. चार भाऊ आणि दोन बहिणी असं त्यांचं कुटुंब. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मयंक यादव यांनी छोटी-मोठी कामं करण्यास सुरुवात केली. प्रभू यादव हे बिहारमधल्या सुपौल जिल्ह्यात राहाणारे आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी ते दिल्लीत आले. सुरुवातील काही दिवस त्यांनी मिठाईच्या दुकानात कामं केलं. 

त्यानंतर त्यांनी चहाची टपरी सुरु केली. अंडी विकण्याचं कामही सुरु केलं. यातून काही पैसे  उभे करत त्यांनी घड्याळ बनवण्याचं दुकान सुरु केलं. पण कोरोना काळात हा व्यवसायही बुडाला. पण आपल्या मुलांना कोणतीही कमी जाणवू दिली नाही.

लहानपणापासून मयंकला क्रिकेटची आवड

मयंक चार वर्षांचा असताना त्याच्या हातात वडिलांनी पहिली बॅट दिली. तेव्हापासून मयंकच्या क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. मयंकची क्रिकेटमधली आवड पाहून वडिलांनी त्याला रोहतक रोड जिमखानात दाखल केलं. इथून मयंकला क्रिकेटची आवड निर्माण झाली. मयंक 16 वर्षांचा असताना त्याला सोनेट क्लबमध्ये पाठवण्यात आलं. तिथे क्रिकेट प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी मयंकवा गोलंदाजीची बारकावे शिकवले. मयंकच्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केलं. अवघ्या 21 वर्षी मयंकची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली. 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंटसने मयंकला 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये संघात घेतलं. पण दुखापतीमुळे तो आयपीएलचा गेला हंगाम खेळू शकला नाही. 

पण सतराव्या हंगामात मयंकला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या वेगाने आयपीएलवर छाप उमटवली. मयंकने पंजाक किंग्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. यात त्याने तब्बल 155.6 KM/H वेगावने चेंडू टाकला. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 155.8 किमी प्रतीतास वेगाने चेंडू फेकला. यंदाच्या हंगामात मयंकने तब्बल तीन वेळा 155 च्या किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे. 

2024-04-03T14:26:11Z dg43tfdfdgfd