धोनीवर इरफान पठाणची जोरदार टीका, म्हणाला की जेव्हा संघाला तुमची गरज असते तेव्हा...

धरमशाला: महेंद्रसिंग धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण ता धोनीवर भारतीय अष्टपैलु इरफान पठाणने जोरदार टीका केली आहे. इरफान हा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. ही गोष्ट आयपीएलमध्ये समालोचनसुद्धा करताना अनेकदा आपण पाहिले आहे. इरफान पठाणने आता महेंद्रसिंग धोनीलाच धारेवर धरत त्याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

रविवारी, चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना झाला. ज्यात धोनी फलंदाजीस नवव्या क्रमांकावर उतरला. आपल्या टी-२० कारकिर्दित धोनीने पहिल्यांदा नवव्या क्रमांकावर फलंदाजी केली असेल. त्याचबरोबर धोनी हर्षल पटेलच्या पहिल्या चेंडूवर शुन्यावरच बाद झाला. त्यामुळे या सामन्याची अधिक चर्चा होत आहे.

पठाणने म्हटले की, ' एमएस धोनीने नवव्या क्रमांकावर फलंदाजी केल्याने चेन्नईला याचा काहीच फायदा होणार नाही. मला माहित आहे की, धोनी ४२ वर्षाचा आहे परंतु तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याने वरच्या फळीत फलंदाजी करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. धोनीने किमान ४ ते ५ षटके फलंदाजी केली पाहिजे. धोनी शेवटच्या षटकात किंवा शेवटच्या दोन षटकात फलंदाजी करतो त्यामुळे चेन्नई संघासाठी आपला उद्देश साध्य करण्यास असमर्थ ठरत.'

धोनीची फलंदाजी यंदाच्या हंगामात उत्कृष्ट अशी आहे, त्याने सात सामन्यात सरासरी ५५ आणि २२४.४९ स्ट्राइक रेटने ११० धावा केल्या आहेत. पठाणने म्हटले आहे की, ' असे होऊ शकते की चेन्नई सुपरकिंग्स प्लेऑफमध्ये आपली जागा मिळवू शकते. पण त्यांना ९० टक्के सामने जिंकावे लागणार. अनुभवी खेळाडू म्हणून धोनीने वरच्या फळीत फलंदाजी करण्याची गरज आहे. धोनीने अनेक सामन्यात जे केले आहे तेच आत्ता करायचे आहे. जेव्हा संघाला तुमची गरज आहे तेव्हा तुम्ही शार्दुल ठाकुरला तुमच्या आधी नाही पाठवू शकत. आपण धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाही बघू शकत. धोनीला कोणीतरी सांगा की, मित्रा तु किमान ४ षटके तरी फलंदाजी कर.'

धोनी चांगल्या फॉर्मात दिसत असला तरी तो जास्त चेंडू खेळत नाही. त्यामुळेच इरफानने याबाबत धोनीवर टीका केली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-06T15:37:23Z dg43tfdfdgfd