पायाचे स्नायू फाटले, धावताना त्रास अन्... महेंद्रसिंग धोनीचं ९व्या क्रमांकावर खेळण्याचं धक्कादायक कारण समोर

चेन्नई: चेन्नईतील धरमशाला येथे पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल २०२४ चा सामना झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर २८ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात एमएस धोनी चांगलाच चर्चेत आला. वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी त्याच्यावर टीकांचा मारा केला. यावरुन सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. गेल्या मोसमात धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर धोनीवर शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, या मोसमातही धोनी अनेकदा गुडघ्यावर पट्टी बांधून दिसला आहे. आता धोनीबाबत नवी माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

अलीकडेच धोनी पंजाब किंग्जविरुद्ध ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यादरम्यान धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी धोनीवर प्रश्न उपस्थित केले. धोनीची इच्छा असूनही तो सध्या ब्रेक घेऊ शकत नाही. कारण संघातील अनेक मजबूत खेळाडू बाहेर आहेत. यामध्ये श्रीलंकेचा मथिशा पाथिराना आणि बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान यांचा समावेश आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जविरुद्ध १२२ धावांवर सहावी विकेट गमावली. पण १६व्या षटकाच्या अखेरीस एमएस धोनी फलंदाजीसाठी क्रीजवर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही आणि त्यांच्या जागी शार्दुल ठाकूर आला. पण शार्दुल चमत्कार करू शकला नाही. अशा परिस्थितीत एमएस धोनी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, जे पाहून सगळेच हैराण झाले. मात्र, धोनी पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. हर्षल पटेलने त्याला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

धोनी गंभीर दुखापतीने ग्रस्त

यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाणने देखील धोनीवर ९व्या क्रमांकावर फलंदाजी केल्याबद्दल टीका केली होती. त्याने असे करू नये की तो आपल्या संघाला निराश करत आहे. धोनीला प्रथम फलंदाजी करता येत नसेल तर त्याने स्वत:ला संघातून वगळावे किंवा दुसऱ्या फलंदाजाला संधी द्यावी, असं त्याचे म्हणणे होते. मात्र यानंतर आता मोठा खुलासा समोर आला आहे. धोनी फलंदाजीसाठी आधी न आल्याचे खरे कारण समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये हा मोठा खुलासा झाला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, धोनीचे स्नायू फाटले आहेत. यामुळेच तो वेगाने धावू शकत नाही. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण डेव्हॉन कॉनवे बाहेर पडल्यानंतरही धोनीकडे पर्याय उरला नव्हता. त्यामुळे धोनी शेवटी यष्टिरक्षणासोबतच फलंदाजीसाठी उतरला.

सरावादरम्यानही ४२ वर्षांचा धोनी अजिबात धावत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. धोनीची संपूर्ण तयारी पार्कच्या बाहेर चेंडू मारण्याची असते. रिपोर्टनुसार, डेव्हन कॉनवे उपलब्ध असता तर धोनीला विश्रांती घेण्याची संधी मिळाली असती. मात्र, डेव्हनच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल खेळता येणार नाही. त्यामुळे माहीला स्वत:ला विश्रांती देण्याचा विचार मनातून काढून टाकावा लागला. अशा परिस्थितीमुळे धोनीला वेदना असूनही खेळावे लागत आहे. यामुळेच धोनीने मोसमाच्या सुरूवातीलाच सीएसकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत ऋतुराज गायकवाडकडे सूत्रे सोपवली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-07T14:10:23Z dg43tfdfdgfd