मार्कसच्या शतकाने लखनौने चेन्नईला त्यांच्याच घरात हरवले, ऋतुराजचे शतक अखेर वाया

चेन्नई : क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामन्यात आला. ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने २१० धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या मार्कस स्टॉइनिसने शतक झळकावले आणि लखनौच्या विजयाच्या आशा उंचावल्या. स्टॉइनिसला यावेळी अखेरच्या षटकात दीपक हुडाने तुफानी फटकेबाजी करत सामन्यात चांगलाच रंग भरला. स्टॉइनिसने यावेळी ६३ चेंडूंत १३ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावांची खेळी साकारली आणि लखनौच्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. लखनौने चेन्नईला त्यांच्याच घरात सहा विकेट्स राखून पराभूत केले.

चेन्नईच्या २११ धावांचा पाठलाग करताना लखनौच्या संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. कारण लखनौचा फॉर्मात असलेला सलामीवीर क्विंटन डीकॉक यावेळी शून्यावर बाद झाला. यावेळी लखनौच्या चाहत्यांच्या आशा या कर्णधार लोकेश राहुलवर होत्या. पण यावेळी राहुलला अपेक्षासारखी कामगिरी करता आली नाही. राहुल यावेळी १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडीक्कलही १३ धावांवर बाद झाला. या तीन विकेट्स पडल्या असल्या तरी लखनौचा संघ पराभूत होईल, असे वाटत नव्हते. कारण त्यावेळी लखनौसाठी तारणहार ठरला होता तो मार्कस स्टॉइनिस. कारण स्टॉइनिसने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना चांगलेच वेठीस धरले होते.

स्टॉइनिसने धमाकेदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले आणि तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. यावेळी त्याला काही काळ निकोलस पुरनची चांगली साथ मिळाली. पुरनने यावेळी १५ चेंडूंत ३४ धावांची खेळी साकारली. त्याला पथिराणाने बाद केले आणि ही जोडी फोडली. पण स्टॉइनिस मात्र त्यानंतरही दमदार फलंदाजी करत राहीला.

तत्पूर्वी, चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करायला उतरला. चेन्नईच्या पहिल्याच षटकात धक्का बसला होता. अजिंक्य रहाणे फक्त एका धावेवर बाद झाला. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाडने लखनौच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ऋतुराजला यावेळी चांगली साथ मिळाली ती शिवम दुबेची. ऋतुराज आणि शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. ऋतुराजने यावेळी आपले शतक साकारले. ऋतुराजने ६० चेंडूंत १२ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद १०८ धावांची खेळी साकारली. ऋतुराजपेक्षा यावेळी शिवम जास्त आक्रमक फलंदाजी करत होता. शिवमने यावेळी २७ चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर ६६ धावांची खेळी साकारली.

ऋतुराजचे शतक आणि शिवमच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने २१० धावांचा डोंगर रचला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T18:22:22Z dg43tfdfdgfd