महेंद्रसिंग धोनीने रचला इतिहास; जगातील ठरला पहिला खेळाडू, नावावर झाला मोठा विक्रम

नवी दिल्ली: चेन्नईने रविवारी सनरायझर्स हैदराबादवर मोठा विजय साकारला. या विजयासह महेंद्रसिंग धोनीच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे. आतापर्यंत जगभरातील एकाही खेळाडूला हा विक्रम करता आलेला नाही. त्यामुळेच धोनीने आयपीएलमध्ये इतिहास रचल्याचे समोर आले आहे.

धोनीने २००८ ला आयपीएलमध्ये पदार्पण करत एकूण २५९ सामने आत्तापर्यंत खेळले आहेत. ४२ वर्षीय धोनी सर्वात यशस्वी असा कर्णधार आहे ज्याने आयपीएलमध्ये ५ वेळा जेतेपद संघाला मिळवून दिले आहे. चेन्नईच्या या विजयामुळे धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये अजून एका विक्रमाची नोंद झाली. टी-२० च्या इतिहासात १५० सामन्यात सहभागी होत विजय मिळविणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला आहे.

धोनीने या आधीही आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून १३३ सामन्यांतील विजयाचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. रोहित शर्मा ८७ विजय मिळवणारा दुसरा कर्णधार आहे. धोनीने आयपीएलच्या २५९ सामन्यात १३७.१३ च्या स्ट्राइक रेटने ५१७८ धावा केल्या आहेत ज्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने यंदाच्या पर्वात सर्वाधिक २५९.४६ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करणारा दुसरा खेळाडू आहे ज्याने ९ पैकी ७ सामन्यांत नाबाद राहत ९६ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय नोंदवलेले खेळाडू

महेंद्सिंग धोनी - १५०

रविंद्र जडेजा - १३३

रोहित शर्मा - १३३

दिनेश कार्तिक - १२५

सुरेश रैना - १२२

रविवारी, हैदराबाद विरुद्ध चेन्नईने आक्रमक फलंदाजी करत २१३ धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५४ चेंडूत ९८ धावा केल्या पण त्याचे यंदाच्या पर्वातील दुसरे शतक हुकले. तसेच डेरिल मिचेल (३२ चेंडूत ५२ धावा) व शिवम दुबे (३० चेंडूत ३९ धावा) यांच्यामुळे चेन्नईला २०० चा आकडा पार करता आला. धोनी ४ चेंडू शिल्लक असताना फलंदाजीस मैदानात उतरला. नटराजनच्या पहिल्या चेंडूवर धोनीने चौकार मारला व पुढच्या चेंडूत १ धावा घेत नाबाद ५ धावा केल्या.

चेन्नईच्या गोलंदाजांनी ही उत्कृष्ट प्रदर्शन करत हैदराबाद संघाला नमते केले. हैदराबाद संघ पुन्हा एकदा धावांचा पाठलाग करण्यास असमर्थ ठरला. हैदराबाद विरुद्ध विजय मिळवत चेन्नई गुणतालिकेत १० गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. त्यामुळे यंदा पुन्हा जेतेपद मिळविण्यासाठी चेन्नई संघ सज्ज झाला आहे. आता यापुढे चेन्नईचा संघ किती विजय मिळवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-29T13:09:40Z dg43tfdfdgfd