ये डर जरूरी है! पाकिस्तानला विराटच्या नावानेच भरतीये धडकी; बाबर म्हणाला, 'आम्ही त्याच्याविरुद्ध..'

T20 World Cup Babar Azam On Virat Kohli: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. टी-20 वर्ल्डकपच्या आधीच बाबरने विराटला रोखण्यासाठी आणि लवकर बाद करण्यासाठी पाकिस्तान विशेष नियोजन करणार आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्डकपला 5 जूनपासून सुरुवात होत आहे. हा वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे. बाबर आझम आयर्लण्डविरुद्ध 10 मेपासून सुरु होत असलेल्या टी-20 मालिकेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये टी-20 वर्ल्डकपचा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्क येथे खेळवला जाणार आहे.

2022 मध्ये विराटने पाकिस्तानच्या तोंडून खेचला विजयाचा घास

2022 साली भारत आणि पाकिस्तानदरम्यान टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात विराटने अविस्मरणीय खेळी केली होती. विराटने 53 बॉलमध्ये नाबाद 82 धावा केल्या होत्या. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार लगावत 160 धावांचा यशस्वीपणे पाठलाग करत भारताला सामना जिंकून दिला होता. 31 धावांवर 4 विकेट्स पडलेल्या असताना विराटने हा सामना जिंकून दिल्याने त्याच्यावर सर्वच स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव झाला होता. विराटने अगदी पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हेरावून आणला होता.

आम्ही खेळाडूविरुद्ध प्लॅन करत नाही पण...

सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बाबरने, पाकिस्तानचा संघ एखाद्या खेळाडूविरुद्ध विशेष प्लॅनिंग करत नाही. मात्र विराटविरुद्ध आम्ही तसं प्लॅनिंग करणार आहोत, असं म्हटलं आहे. विराट कोहली हा सध्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. बाबरचं विधान ऐकून 2022 मधील पाकिस्तानच्या पराभवाची आठवण आजही त्याच्या मनात कायम असल्याचं स्पष्ट होत आहे. 

विराटविरुद्ध नक्की प्लॅनिंग करु

"संघ म्हणून आम्ही वेगवेगळ्या टीमविरुद्ध प्लॅनिंग करतो. त्यांच्या सामर्थ्यावर आधारित आम्ही नियोजन करतो. आम्ही सामान्यपणे कोण्या एका खेळाडूविरुद्ध प्लॅनिंग करत नाही. आम्ही सर्व 11 खेळाडूंविरुद्ध नियोजन करतो. आम्हाला न्यूयॉर्कमधील परिस्थितीबद्दल फारशी कल्पना नाही. आम्ही त्यानुसार नियोजन करु. तो (विराट कोहली) हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आम्ही त्याच्याविरुद्ध नक्कीच प्लॅनिंग करु," असं बाबर म्हणाला. यावरुनच विराटच्या नावाने आजही पाकिस्तानला धडकी भरते हेच दिसून येत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

विराटची पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी

विराट कोहलीचा टी-20 मधील पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड उत्तम आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 488 धावा केल्या आहेत. त्याची धावा करण्याची सरासरी 81.33 इतकी आहे. त्याचा स्ट्राइक रेट 123 इतका आहे. त्याने या 10 पैकी 5 सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 82 नाबाद हा आहे. 

2024-05-07T10:32:18Z dg43tfdfdgfd