सनरायझर्स हैदराबादने दिल्लीच्या मैदानावर इतिहास रचला; गोलंदाजाची बेदम धुलाई, हेडचे १६ चेंडूत अर्धशतक तर...

दिल्ली: आयपीएल २०२४ मध्ये ३५वी लढत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दिल्लीत सुरू आहे. या लढतीत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय घेताना पंतला जरा देखील कल्पना आली नसले की पुढील काही तासात दिल्लीच्या गोलंदाजांसोबत काय होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध २७७ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध २८७ धावांचा विक्रम करणाऱ्या हैदराबादच्या फलंदाजांनी विस्फोटक अशी कामगिरी केली.

पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या हैदराबादने तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सलामीवीर ट्रेव्हिस हेडने फक्त १६ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये खलील अहमदला १५ धावा कुटल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये ललित यादवला १७ तर तिसऱ्या ओव्हरमध्ये नॉर्तजेविरुद्ध २२ धावा करत १६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगाने अर्धशतक अभिषेक शर्माच्या नावावर आहे. त्याने याच हंगामात १६ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. तेव्हे हेडने १८ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये अर्धशतक करण्याची ही हेडची तिसरी वेळ ठरली. अशी कामगिरी डेव्हिड वॉर्नरने ६ वेळा केली आहे.

हैदराबादने फक्त ३० चेंडूत संघाचे शतक देखील पूर्ण केले. स्पर्धेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले जेव्हा एखाद्या संघाने ५ ओव्हरमध्ये शतक पूर्ण केले असेल. पॉवर प्लेमध्ये त्यांनी १२५ धावा केल्या होत्या. ज्यात शर्माचे योगदान १० चेंडूत ४० तर हेडचे योगदान २६ चेंडूत ८४ असे होते.

सातव्या षटकात हैदराबादला पहिला झटका बसला. कुलदीप यादवने शर्माला ४६ धावांवर बाद केले. ३८३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, ज्यात ६ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर आलेल्या मार्करामला कुलदीपने लगेच माघारी पाठवले.

झटपट दोन विकेट गेल्यानंतर देखील हेडची बॅट तळपत होती. तो ३० चेंडूत शतक पूर्ण करेल असे वाटत असताना पुन्हा एकदा कुलदीपची जादू चालली. त्याने हेडला ८९ धावांवर माघारी पाठवले. हेड बाद झाला तेव्हा हैदराबादने ८.४ षटकात १५४ धावा केल्या होत्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-20T15:42:36Z dg43tfdfdgfd