हार्दिक रोहितचा का करतो एवढा द्वेष, सामना संपल्यावर केलं अशोभनीय कृत्य, पाहा काय घडलं...

मुंबई : रोहित शर्माने नेमकं हार्दिक पंड्याचं काय बिघडवलं आहे, असा प्रश्न आता चाहत्यांना पडायला लागला आहे. कारण चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तर रोहित शर्माने शतक झळकावले. पण हा सामना संपल्यावर हार्दिकने अशोभनीय कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हार्दिक रोहितचा एवढा द्वेष का करतो, असा प्रश्न आता सर्वच चाहते विचारायला लागले आहेत.

सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...

सामना संपल्यावर हार्दिक म्हणाला की, " चेन्नईने आम्हाला दिलेले आव्हान हे गाठण्यासारखे होते. पण चेन्नईच्या संघाने चांगली गोलंदाजी केली. पथिराणाने दोन्ही संघांतील फरक स्पष्टपणे दाखवून दिला. चेन्नईच्या संघाने स्मार्ट रणनिती यावेळी वापरली आणि त्यामुळेच ते यशस्वी ठरले. चेन्नईच्या स्टम्पच्या मागे जो व्यक्ती (धोनी) असतो तो संघात काय कमतरता आहे ते दाखवून देतो आणि त्यामुळेच विजय मिळवणे सोपे होते. जोपर्यंत ़पथिराणा गोलंदाजीला आला नव्हता तोपर्यंत आम्ही विजयाच्या मार्गावर होतो. पण पथिराणा गोलंदाजीला आला आणि सर्व गोष्टी बदलल्याचे पाहायला मिळाले."

हार्दिक यावेळी धोनीबद्दल बोलला, पथिराणाचे कौतुक त्याने केले. पण ज्या खेळाडूने आपल्या संघासाठी शतक झळकावले आणि एकाकी झुंज दिली त्या रोहित शर्माबाबत हार्दिकने एकही शब्द यावेळी काढला नाही. क्रिकेटसारख्या खेळात प्रतिस्पर्धी खेळाडूचेही कौतुक केले जाते, पण ते होत असताना आपल्या संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूबद्दल चकार शब्दही हार्दिकने काढला नाही. हार्दिक पंड्या हे सर्व रोहितच्या द्वेषापोटीच करत असल्याची भावना चाहत्यांच्या मनात आहे आणि सामना संपला असला तरी त्यावर जोरदार चर्चा सुरु आहे. रोहितने शतक झळकावल्यावर त्याच्याबाबत कर्णधाराने एक शब्दही न उच्चारणं, यामध्ये बरंच काही समोर येत आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघात सर्व काही आलबेल आहे की नाही, अशी चर्चा पुन्हा एकहा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना चांगलाच रंजकदार झाला. या सामन्यात चेन्नईला ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने फक्त चार चेंडूंत तीन षटकारांसह २० धावा लूटल्या. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला २०६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर मुंबई इंडियन्सला रोहित शर्माने दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळेच मुंबईला ७ षटकांमध्ये बिन बाद ७० अशी मजल मारता आली होती. पण त्यानंतर ईशान किशन आऊट झाला आणि ठराविक फरकाने मुंबईचे फलंदाज बाद होत गेले. रोहित शर्माने १०५ धावांची खेळी साकारली, पण मुंबईला चेन्नईकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला.

हार्दिकमुळे रोहितचे कर्णधारपद गेले, हे सर्वांनाच माहिती आहे. पण रोहितबाबत हार्दिक असं का वागत आहे, याचे उत्तर मात्र चाहत्यांना अजूनही मिळालेले नाही.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-15T13:06:28Z dg43tfdfdgfd