दुसऱ्या गोल्ड मेडलनंतरही महाराष्ट्राच्या सचिनची सरकारकडून पहिल्या बक्षिसाची प्रतीक्षा कायम

संजय घारपुरे : सांगली जिल्ह्यातील करगनी गावच्या सचिन खिलारीने सलग दुसऱ्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्समध्ये गोळा फेकीतील 'एफ४६' गटात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला; पण सांगलीच्या या युवकाला पहिल्याच जागतिक यशानंतर सरकारकडून मिळणाऱ्या बक्षिसाची अजून प्रतीक्षा आहे.

सचिन खिलारी याने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेकीतील 'एफ४६' प्रकारातील सुवर्णपदक राखण्यात बुधवारी यश मिळवले. त्याने जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत ही कामगिरी करताना आशियाई विक्रम केला. त्याच्या यशामुळे भारताने आता या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सचिनने १६.३० मीटर अंतरावर गोळाफेक केली. त्याने हे यश मिळवताना १६.२१ मीटरचा आशियाई विक्रम मोडीत काढला. लहानपणी सायकलवरून पडल्यामुळे त्याला गँगरीन झाले होते. अनेकदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या; पण त्याला डावा हात गमवावाच लागला.

सचिनने गतस्पर्धेपेक्षा खडतर आव्हान असतानाही सोनेरी कामगिरी केली. मात्र, केंद्र सरकार देणार असलेले वीस लाख आणि राज्य सरकार देणार असलेले तीन लाख रुपयांचे बक्षिस अजून त्याच्यापर्यंत पोहोचलेलेच नाही. 'पहिल्याच स्पर्धेत जिंकलेल्या जागतिक विजेतेपदाच्या बक्षिसाची अजून प्रतीक्षा आहे. दुसऱ्या विजेतेपदानंतरच्या बक्षिसाबद्दल कसे बोलू शकणार? केंद्र सरकारकडून मला वीस लाख रुपये मिळणे अपेक्षित होते, तर राज्य सरकारकडून तीन लाख. मात्र, ही बक्षिस रक्कम अजून मिळालेलीच नाही,' असे त्याने सांगितले.

सचिनला या बक्षिसाची आशा आहे; पण त्यासाठी तो आपल्या स्पर्धा आणि सराव सोडण्यास तयार नाही. 'मी बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करतो; पण त्यासाठी सराव सोडता येत नाही. आता दुसऱ्या जागतिक विजेतेपदानंतरच्या पारितोषिक रकमेसाठीही प्रयत्नही करता येणार नाहीत. त्यासाठी वेळच कुठे आहे. या स्पर्धेपाठोपाठ पॅरालिम्पिक आहे. माझ्या जागतिक स्पर्धेतील यशामुळे मिळणाऱ्या बक्षिसापेक्षाही पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक माझ्यासाठी मोलाचे आहे. त्यामुळे मी आता त्याकडेच लक्ष केंद्रीत करणार आहे,' असे सचिनने सांगितले.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील सचिनला सायकलवरून पडल्यामुळे जखम झाली. त्यातून गँगरीन झाले आणि त्यामुळे डाव्या हातात अपंगत्त्व आले. सचिनला आई-वडील नाहीत. तो आणि त्याचा लहान भाऊ करगणी गावातील खिलारी वाडीत राहतात. त्याची शेती आहे. या ३४ वर्षीय युवकाला आपण सलग दुसऱ्या स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली, याचा आनंद आहे. 'गतस्पर्धेपेक्षा स्पर्धा खडतर होती. त्याचबरोबर वातावरणही सतत बदलत होते. कधी पाऊस होता तर कधी थंडी... या परिस्थितीतून यश मिळवले, याचा जास्त आनंद आहे,' असे त्याने सांगितले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-23T18:07:50Z dg43tfdfdgfd