हॉस्पिटलमध्ये असलेल्या आईसाठी जिंकली आयपीएलची ट्रॉफी, केकेआरसाठी ठरला गेमचेंजर खेळाडू...

चेन्नई : केकेआरने आयपीएल जिंकली. पण केकेआरच्या एका खेळाडूसाठी ही आयपीएलची ट्रॉफी खास आहे. कारण या खेळाडूची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिला आपल्या लेकाने आयपीएलची ट्रॉफी हातात घ्यावी, असे वाटत होते. आईचे हे स्वप्न लाडक्या लेकाने पूर्ण केले आणि आईला एक छानशी भेट दिली. हा खेळाडू आपल्या संघासाठी गेम चेंजर ठरल्याचेही या आयपीएलमध्ये पाहायला मिळाले.

केकेआरसाठी हा हंगाम स्वप्नवत असाच राहीला. केकेआरने दमदार सुरुवात करत आपला दबदबा स्पर्धेत कायम राखला. अखेरच्या काही सामन्यांमध्ये तर केकेआरला पराभूत करणे, सोपे नसल्याचे सर्वांना जाणवले. फायनलमध्ये तर त्यांनी चॅम्पियन्सला साजेसा खेळ केला. हैदराबादसारखा संघ जो या आयपीएलमध्ये सातत्याने २०० धावा करत होता, त्या बलाढ्य संघाला त्यांनी ११३ धावांत गुंडाळले. त्यानंतर विजयासाठी असलेले ११४ धावांचे आव्हान लीलया पेलले आणि जेतेपदाला गवसणी घातली. या विजयात केकेआरच्या एका खेळाडूचे महत्वाचे योगदान होते आणि तोच केकेआरसाठी गेमचेंजर ठरल्याचे पाहायला मिळाले.

केकेआरच्या संघातील फिल सॉल्ट हा भन्नाट फॉर्मात होता. पण टी-२० वर्ल्ड कपसाठी त्याला आयपीएल सोडावी लागली. त्यामुळे आता सॉल्टची जागा कोण भरून काढणार, हा मोठा प्रश्न केकेआरच्या संघापुढे होता. केकेआरने यावेळी एका खेळाडूला संधी द्यायची ठरवली आणि या खेळाडूने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत संधीचे सोने केले. आयपीएलच्या फायनलमध्ये त्याने सर्वाधिक पाच चौकार लगावत पुरस्कार पटकावला तो रहमानुल्लाह गुरबाजने. केकेआरकडून गुरबाज खेळत असताना त्याची आई हॉस्पिटलमध्ये होती. पण आईची इच्छा होती की, आपल्या मुलाने मैदानात जाऊन खेळावे आणि ट्रॉफी जिंकावी. गुरबाजचे केकेआरकडून दमदार कामगिरी करत असला तरी त्याचे लक्ष आपल्या आईच्या तब्येतीकडेही होते. फायनलचा सामना संपल्यावर ही गोष्ट गुरबाजने सर्वांना सांगितली.

सामना संपल्यावर हर्षा भोगले यांनी गुरबाजची मुलाखत घेतली. त्यामध्ये गुरबाज म्हणाला की, " माझ्या आईची तब्येत आता ठीक आहे. हा फायनलचा सामना सुरु होण्यापूर्वी मी तिला फोन केला होता. तेव्हा तिने मला सांगितले की, हा सामना तुम्ही जिंकायला हवा, कारण आयपीएलची ट्रॉफी मला तुझ्या हातात पाहायची आहे." गुरबाजच्या आईची इच्छा अखेर पूर्ण झाली. कारण केकेआरने जेतेपदाला गवसणी घातली आणि आयपीएलची ट्रॉफी गुरबाजच्या हातात आली.

केकेआरसाठी गुरबाज हा गेमचेंजर ठरला. कारण त्याने फिल सॉल्टची जागा घेतली आणि संघाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. त्याचबरोबर गुरबाजला आपल्या आईचे स्वप्नही यावेळी पूर्ण करता आल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-27T12:07:17Z dg43tfdfdgfd