6, 6, 6, 6... रोहित, गेल पडले मागे, T20चा नवा बादशाह... ठोकलं वेगवान शतक

Jan Nicol Loftie-Eaton: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक नवे विक्रम रचले जातात, तर काही विक्रम मोडले जातात. आता असाच एक नवा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेलाय. रोहित शर्मा (Rohit Sharma), ख्रिस गेल (Chris Gayle) या दिग्गजांना मागे टाकत 22 वर्षांच्या फलंदाजाने इतिहास रचला आहे.  या फलंदाजाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक (fastest t20i century) ठोकलं आहे. 22 वर्षांच्या फलंदाजाचं नाव आहे जान निकोल लॉफ्टी ईटन (Jan Nicol Loftie Eaton).  नामिबियाच्या या फलंदाजाने नेपाळ टी20 आंतरराष्ट्रीय ट्राय सीरिजमध्ये हा विक्रम रचला आहे. जान निकोल लॉफ्टी ईटनने नेपाळविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत अवघ्या 33 चेंडूत शतक पूर्ण केलं. टी20 क्रिकेटमध्ये हे सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. याआीधी हा विक्रम नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाच्या नावावर होता. कुशलने 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध  34 चेंडूत शतक झळकावलं होतं. 

चौकार-षटकरांची बरसात

22 वर्षांच्या नामिबाई फलंदाज जान निकोलने नेपाळच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. मैदानावर त्याने चौकार-षटकारांची बरसात केली. जान निकोलने 36 चेंडूत 101 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 8 षटकार आणि 11 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट होता  280.56  इतका. जान निकोलचा वेगवान शतकाचा विक्रम मोडणं इतकं सोप नाही. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारतीय फलंदाज आहे. रोहित शर्माने 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्ध 35 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनेही 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता हे सर्व विक्रम मागे पडले आहेत. 

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारे फलंदाज

जान निकोल लॉफ्टी ईटन (नामीबिया) - 33 चेंडू

कुशल मल्ला (नेपाळ ) - 34 चेंडू 

डेविड मिलर (दक्षिण अफ्रीका) - 35 चेंडू

रोहित शर्मा (भारत) -  35 चेंडू

सुदेश विक्रमशेखर (चेक रिपब्लिक) - 35 चेंडू 

नामिबियाने बनवले 206 धावा

नेपाळ, नेदरलँड आणि नामीबिया संघांमध्ये टी20 आंतरराष्ट्रीय ट्राय सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजच्या पहिल्याच सामन्यात वेगवान शतकाचा विक्रम झाला आहे. नेपाळ आणि नामीबियादरम्यानच्या या सामन्यात जान निकोलच्या 101 धावांच्या जोरावर नामीबियाने 20 षटकात 4 विकेट गमावत 206 धावा केल्या. 

2024-02-27T09:30:11Z dg43tfdfdgfd