ALL ENGLAND BADMINTON : भारताच्या लक्ष्य सेनने दिला अँडर्सला धक्का, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

दिगंबर शिंगोटे : भारताच्या लक्ष्य सेन याने गुरुवारी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा डेन्मार्कच्या अँडर्स अॅन्टनसनला २४-२२, ११-२१, २१-१४ असा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.

जागतिक क्रमवारीत २२ वर्षीय लक्ष्य अठराव्या, तर २६ वर्षीय अँडर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे दोघे चार वेळा आमनेसामने आले होते. त्यात लक्ष्यने एकदाच बाजी मारली होती. विशेष म्हणजे २०२२च्या ऑल इंग्लंड स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच लक्ष्यने अँडर्सला हरवले होते. तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी लक्ष्य उत्सुक होता. दुसरीकडे, लक्ष्यविरुद्ध सलग चौथी लढत जिंकण्यास अँडर्स सज्ज होता. पहिल्या गेममध्ये या दोघांत ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. अँडर्सने १८-१७ अशी आघाडी मिळवली होती. त्या वेळी लक्ष्यने सलग तीन पॉइंट घेतले. अर्थात, लक्ष्यकडे दोन गेम पॉइंट होते. अँडर्सने झुंज देऊन ते वाचवले. मात्र, मोक्याच्या क्षणी पॉइंट मिळवून लक्ष्यने पहिली गेम जिंकली.

दुसऱ्या गेममध्ये ब्रेक झाला तेव्हा अँडर्सने ११-७ अशी आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर लक्ष्यला प्रतिकाराची फारशी संधी न देता अँडर्सने गेम जिंकली आणि आव्हानही राखले. निर्णायक, तिसऱ्या गेममध्ये अँडर्सने चांगली सुरुवात केली होती. त्याने ९-३ अशी आघाडी मिळवली होती. ब्रेकनंतर अँडर्सने १२-६ अशी आघाडी कायम राखली होती. मात्र, लक्ष्यने हार मानली नाही. त्याने जिद्दीने खेळ केला. त्याने पिछाडी कमी केली.

अँडर्सकडे १४-१३ अशी निसटती आघाडी असताना लक्ष्यने सलग आठ पॉइंट घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केले. ही लढत १ तास २० मिनिटे चालली. ही लढत चांगलीच रंगतदार झाली. कारण या लढतीत कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण भारताच्या लक्ष्य सेनने हार मानली नाही. सेन यावेळी अनुभवाच्या जोरावर कडवीं झुंज देत राहीला आणि त्याला अखेर यश मिळाल्याचे पाहायला मिळाले.

आता लक्ष्य सेन हा उपांत्यपूर्ण फेरीत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-15T14:02:56Z dg43tfdfdgfd