CSK VS RCB मॅचसाठी चेन्नईचा संघ जाहीर, ऋतुराजने PLAYING XI मध्ये कोणाला संधी दिली पाहा...

चेन्नई : ऋतुराज गायकवाडला चेन्नईच्या संघाचे प्रथम नेतृत्व करत असताना टॉस जिंकता आला नाही. आरसीबीने यावेळी टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा हा या हंगामातील पहिलाच सामना आहे. त्यामुळे या सामन्यासाठी ऋतुराजने दमदार संघ निवडलेला पाहायला मिळाला आहे.

ऋतुराजने या संघात राचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, महीशा तीक्षणा आणि मिस्ताफिझूर रेहमान या विदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या 'दक्षिण डर्बी'ने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, शुक्रवारी सुरुवात होईल. चेन्नईची धुरा आता नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. स्वतः धोनीने ऋतुराजकडे नेतृत्व सोपविले आहे.

यंदाच्या मोसमाअखेरीस धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे खांदेपालट झाला आहे. आता ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नई विक्रमी सहावे जेतेपद पटकावणार का, याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे, बेंगळुरूला त्यांच्या महिला संघाच्या जेतेपदातून प्रेरणा लाभली आहे. बेंगळुरू संघ यंदाच्या आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी उत्सुक आहे. तेव्हा मोसमाची सुरुवात विजयाने करण्यास बेंगळुरू संघ उत्सुक आहे. बेंगळुरू संघाला २००८नंतर चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जला नमविता आलेले नाही. ही पराभवाची मालिका बेंगळुरू खंडित करणार का, याकडेही साऱ्यांचे लक्ष असेल.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने मुबलक यश मिळविले असून, आता या माजी कर्णधाराची आयपीएल कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. धोनीच्या क्रिकेट हुशारीबद्दल दूमत नाहीच; पण फलंदाज म्हणून त्याच्या हालचाली मंदावल्या आहेत. अशा परिस्थितीत चेन्नई संघातील युवा खेळाडूंनी जबाबदारी घ्यायला हवी. अंगठ्याच्या दुखापतीमुळे डेव्हॉन कॉन्वे गैरहजर असेल, त्याच्याऐवजी न्यूझीलंडच्या राचिन रवींद्रला संधी देण्यात आली आहे. मधल्या फळीत त्याला साथ लाभेल ती न्यूझीलंडच्याच डॅरिल मिचेलची. याशिवाय अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाडसारखे फलंदाजही चेन्नईकडे आहेत.

ऋतुराजने मुश्ताक अली करंडक स्पर्धेत महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा कुटल्या आहेत. चेन्नईची खरी ताकद त्यांचे अष्टपैलू आणि फिरकी गोलंदाजांमध्ये आहे. ही मंडळी आपल्या चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीवर दमदार कामगिरी करण्यात पटाईत आहेत. रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, रवींद्र, महीश तिक्षणा यांची गोलंदाजी चेन्नईत प्रभावी ठरते. चेन्नईच्या वेगवान गोलंदाजीची धुरा दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांच्यावर असेल. दरम्यान श्रीलंकेचा मथिशा पथिराना दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही लढतींमध्ये भाग घेणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला दुखापत झाली आहे. डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये चेन्नईला त्यांची पोकळी जाणवेल. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-22T14:20:24Z dg43tfdfdgfd