IND VS ENG 5TH TEST : रजत पाटीदारवर 'मेहेरबानी' का? पत्रकार परिषदेत ROHIT SHARMA स्पष्टच म्हणाला...

Rohit Sharma On Rajat Patidar : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा (IND vs ENG 5th Test) सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाईल. टीम इंडिया मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) ब्रिगेडची नजर शेवटच्या सामन्यातही विजयाकडे असणार आहे. केएल राहुल संघाबाहेर झाल्याने आता रजत पाटीदारला (Rajat Patidar) पुन्हा संधी मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. रजतने 3 कसोटी सामन्यात फक्त 63 धावा केल्या आहेत. त्यात त्याची सरासरी केवळ 10.50 राहिलीये. मात्र, रजत पाटीदारला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. सामन्याआधी प्रेस कॉन्फरेन्समध्ये (Press Conference) रोहित शर्माने याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाला रोहित शर्मा?

रजत पाटीदार हा कसोटी क्रिकेटमध्ये खूप नवीन आहे, त्यामुळे त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ द्यावा लागेल. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे. मी त्याला खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं आहे. अनेक कठिण परिस्थितीत तो खेळू शकतो आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे आता रजत पाटीदारला संघात कायम ठेवणार का? असा सवाल विचारला जातोय.

आश्विनचं कौतूक

आश्विनसाठी ही खूप मोठा क्षण आहे आणि आमच्यासाठी देखील... हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आश्विन आमच्यासाठी मॅच विनर खेळाडू आहे. त्याने आमच्यासाठी जे काही केले, त्याची प्रशंसा करणे पुरेसे नाही. गेल्या पाच-सात वर्षांतील त्याची कामगिरी, प्रत्येक मालिकेत त्याने योगदान दिले आहे. त्याच्यासारखे खेळाडू मिळणे दुर्मिळ आहे, असं म्हणत रोहित शर्माने आर आश्विनचं कौतूक केलंय.

ऋषभ पंत आठवतोय का?

रोहित शर्माला पत्रकार परिषदेत बेन डकेटने यशस्वी जयस्वालसंबंधी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. यशस्वीच्या दमदार खेळीचं श्रेय इंग्लंडच्या संघाला देयला हवं, शेवटी इंग्लंडनेच बेझबॉलचा आविष्कार केलाय, असं बेन डकेट म्हणाला होता. त्यावेळी रोहित शर्माने बेन डकेटला ऋषभ पंतची आठवण करून दिली. "आमच्या संघात ऋषभ पंत नावाचा खेळाडू होता, कदाचित बेन डकेटने त्याला खेळताना पाहिलं नसेल," असं रोहित शर्मा म्हणाला.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन (England playing XI) : 

बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (C), बेन फोक्स, टॉम हार्टली, शोएब बशीर, मार्क वुड, जेम्स अँडरसन.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India's Probable playing XI) : 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल/रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

2024-03-06T14:37:20Z dg43tfdfdgfd