IND VS ENG TEST SERIES : भारत-इंग्लंडने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘हे’ घडलं

India and England create history in test cricket : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनेक विक्रम केले गेले. धरमशाला येथे झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात एक असा विक्रम झाला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कसोटी इतिहासात असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी या मालिकेत भरपूर चौकार आणि षटकार मारले. ज्यामुळे ही कसोटी मालिका आहे असे वाटत नव्हते. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकदिवसीय शैलीत फलंदाजी केली आणि १०० हून अधिक षटकार मारत इतिहास रचला.

इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने मालिकेतील शंभरावा षटकार मारला. दुसऱ्या डावात त्याने ही कामगिरी केली. योगायोगाने, त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यात, बेअरस्टोने आपला १०० वा कसोटी सामना खेळत असलेला फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर मालिकेतील १०० वा षटकार मारला. मात्र, बेअरस्टो जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. तो ३१ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. ज्यामुळे मालिकेतील एकूण षटकारांची संख्या १०१ पोहोचली आहे. या मालिकेती सर्वाधिक षटकार यशस्वी जैस्वालने मारले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमाकांवर शुबमन गिल आहे, ज्याने ११ षटकार मारले आहेत.

एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा घडले होते –

कसोटी क्रिकेटच्या १४७ च्या इतिहासात प्रथमच द्विपक्षीय मालिकेत १०० षटकार मारले गेले आहेत. याआधी वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये असे घडले आहे. विशेष म्हणजे तिन्ही फॉरमॅटमध्ये दोनदा भारत आणि इंग्लंडचा संघ होता. वनडे फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच एकाच मालिकेत १०० षटकार मारले गेले होते. २०१३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान हा प्रकार घडला होता. आता कसोटी फॉरमॅटमध्येही भारतीय संघ या विक्रमाचा एक भाग झाला आहे.

हेही वाचा – IND vs ENG : “त्याचे भविष्य खूप उज्ज्वल…”, पाचव्या कसोटीनंतर रोहित शर्माने यशस्वी जैस्वालचे केले कौतुक

टी-२० मध्येही इंग्लंडच्या नावावर विक्रम –

कसोटी आणि एकदिवसीय व्यतिरिक्त, हे टी-२० फॉरमॅटमध्येही घडले आहे. २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या द्विपक्षीय मालिकेत १०० षटकार मारले गेले होते. अलीकडच्या काही वर्षांत इंग्लंडच्या फलंदाजांनी स्ट्राइक रेटकडे खूप लक्ष दिले आहे. याचाच परिणाम म्हणजे २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला. कसोटी फॉरमॅटमध्ये आक्रमक फलंदाजी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली तरी इंग्लिश संघाला त्याचा फटका बसत आहे.

2024-03-09T12:19:27Z dg43tfdfdgfd