IND VS PAK सामन्याला धमकी देणारी दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये कार्यरत, समोर आली माहिती

न्यूयॉर्क : टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान या लढतीस इस्लामिक स्टेट-खोरासन ही दहशतवादी संघटना लक्ष्य करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सुरुवातीस अमेरिकेतील वर्ल्ड कप लढती लक्ष्य करणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेस मिळाली होती. मात्र, आता थेट भारत-पाक लढतच लक्ष्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण या सामन्याला धमकी देणारी, ही संघटना काय करते आणि आतापर्यंत तिने काय केले आहे, याची माहिती आता समोर आली आहे.

इस्लामिक स्टेट-खोरासन दहशतवादी संघटनेची माहिती....

इस्लामिक स्टेट-खोरासन २०१५मध्ये स्थापना करण्यात आली. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणमध्ये प्रामुख्याने कार्यरत ही संघटना कार्यरत आहे.

ही संघटना ‘आयएस’ची शाखा आहे. प्रामुख्याने दहशतवादी हल्ले करण्याचे काम ही संघटना करते. इस्लामिक स्टेट-खोरासन (आयएस-के) आणि आयएस यांच्यातील नेमके संबंध अस्पष्ट आहेत. २०१८मध्ये आयएस-के ही चौथ्या क्रमांकाची दहशतवादी संघटना असल्याचा इकॉनॉमिक्स अँड पीस संघटनेचा दावा आहे.

या दहशतवादी संघटनेनेच काबुल विमानतळावरील हल्ला केला होता, त्यात १३ अमेरिकी सैनिकांसह १७० अफगाणिस्तानचे नागरिक ठार केले होते. या संघटनेकडे दोन हजारहून जास्त दहशतवादी असल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानमधील कुनार आणि नानगारहर प्रांतात या संघटनेचा तळ असल्याचे म्हटले जाते. मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्यामागे हीच संघटना असल्याचा संशय आहे, या हल्ल्यात १३७ ठार झाले होते.

न्यूयॉर्क प्रांतातील नासाऊ येथे वर्ल्ड कप लढतीसाठी स्टेडियमची उभारणी करण्यात आली आहे. वर्ल्ड कपला धोका असल्याची धमकी प्रथम एप्रिलमध्ये देण्यात आली होती. आता एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारीत होत आहे. त्यात भारत-पाक लढत लक्ष्य असल्याचे सुचीत होत आहे. ‘नासाऊ काउंटी’चे पोलिस आयुक्त पॅट्रिक जे रायडर यांनी याबाबत माहिती दिली. भारत-पाक लढत एल्सेनहोवर पार्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

‘भारत-पाक लढत ही ‘सुपर बाऊल’सारखीच आहे. या वर्ल्ड कपच्या निमित्ताने जगातील संघ येत आहेत. सर्व जगातून क्रिकेटचे चाहते येणार आहेत. आम्ही सहा महिन्यांपासून या लढतींसाठी तयारी करीत आहोत. त्याबाबत सुरक्षा; तसेच आरोग्य यंत्रणेसह चर्चा सुरू आहे,’ असे नासाऊ काउंटीचे ब्रूस ब्लॅकमन यांनी सांगितले. न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड कपच्या आठ लढती होतील. त्यात भारताचे तीन सामने आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-31T02:51:24Z dg43tfdfdgfd