IPL 2024 : करन ठरला पंजाबसाठी अर्जुन, कर्णधाराला साजेशी खेळी साकारत राजस्थानवर मात

गुवाहाटी : कर्णधार असावा तर तो सॅम करनसारखा. कारण सॅमने कर्णधाराला साजेशी खेळी साकारत पंजाबच्या संघाला दमदार विजय मिळवून दिला. सॅमने दोन विकेट्स मिळवले आणि त्यानंतर अर्धशतकी खेळी साकारत राजस्थानच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. पंजाबने भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला १४४ धावांत रोखले होते. पण राजस्थानच्या १४५ धावांचा पाठलाग करताना पंजाबला सुरुवातीलाच चार धक्के बसले. पण यामधून कर्णधार सॅम करनने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. करनच्या या खेळीमुळे पंजाबला राजस्थानवर पाच विकेट्स राखून विजय मिळवता आला. सॅमने यावेळी ४१ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ६३ धावा केल्या.

राजस्थानचे १४५ धावांचे आव्हान माफक वाटत असले तरी त्यांनी पंजाबला सुरुवातीला चांगलेच धक्के दिले. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पंजाबला पहिल्याच षटकात धक्का दिला. त्यानंतर अवेश खानने रिली रोसू आणि शशांक सिंग यांना बाद करत पंजाबला अजून दोन धक्के दिले. रिलीने यावेळी २२ धावा केल्या, तर शशांकला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर युजवेंद्र चहलने जॉनी बेअरस्टोला बाद करत पंजाबला चौथा धक्का दिला. त्यामुळे पंजाबची ४ बाद ४८ अशी अवस्था झाली होती. पण यावेळी संघाच्या मदतीला धावून आला तो कर्णधार सॅम करन. यावेळी करनने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आणि त्यामुळे पंजाबला विजयाची आशा निर्माण झाली होती आणि त्याने संघाला सामना जिंकवून दिला.

पंजाबच्या संघाने राजस्थानच्या धावसंख्येवर चांगलाच अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. पंजाबने पहिल्याच षटकात राजस्थानला सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या रुपात पहिला धक्का दिला. यशस्वीला यावेळी चार धावा करता आल्या. त्यानंतर सर्वांचे लक्ष राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनवर लागलेले होते. पण संजूलाही यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. संजूला यावेळी १८ धावांवरच समाधान मानावे लागले. पण त्यानंतर रायन पराग आणि आर. अश्विन यांची चांगलीच जोडी जमली होती. ही जोडी संघाला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे सर्वांना वाटत होते.

पंजाबसाठी यावेळी धावून आला तो वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग. अश्विनला यावेळी अर्शदीप सिंगने शशांक सिंगकरवी झेल बाद केले आणि ही जोडी फोडली. अश्विनने यावेळी २८ धावा केल्या. अश्विन बाद झाला आणि राजस्थानचा डाव गडगडायला सुरुवात झाली. अश्विननंतर ध्रुव जुरेल हा शून्यावर बाद झाला, तर रोवमन पॉवेलला चार धावाच करता आल्या. एकिकडे संघाची पडझड सुरु असताना रायन परागने राजस्थानच्या संघाची कमान सांभाळली होती. रायन यावेळी अर्धशतक झळकावेल, असे वाटत होते. पण यामध्ये तो अपयशी ठरला. परागने यावेळी सहा चौकारांच्या जोरावर ४८ धावांची खेळी साकारली. परागच्या या खेळीच्या जोरावरच राजस्थानच्या संघाला १४४ धावांपर्यंत मजल मारता आली.

पंजाबच्या संघाने यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. पंजाबकडून सॅम करन, राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. अर्शदीप सिंगने यावेळी परागचा एकमेव पण महत्वाचा बळी मिळवला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-15T17:57:26Z dg43tfdfdgfd