IPL 2024: 'या' कर्णधारांना आयपीएलदरम्यान मिळाला होता डच्चू, पुढचा नंबर हार्दिक पांड्याचा?

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाच्या सुरुवातीला काही संघांचे कर्णधार बदलण्यात आले. सनरायजर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडे नेतृत्व सोपवलं. तर गुजरात टायटन्सन युवा शुभमन गिलवर विश्वास दाखवला. स्पर्धेच्या ऐन एक दिवस आधी महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आणि ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपद मिळवून दिलेल्या रोहित शर्माकडून (Rohit Sharma) कर्णधारपद काढून घेतलं आणि गुजरात टायटन्समधून आयात केलेल्या हार्दिक पांड्याकडे मुंबईची धुरा सोपवण्याता आली. पहिल्या दोन सामन्यातच मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला आणि हार्दिक पांड्याच्या नेृत्वावर प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

पहिल्या दोन सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) घेतलेले निर्णय मुंबईच्या (Mumbai Indians) पराभवास कारणीभूत ठरल्याचा आरोप त्याच्यावर केला जातोय. त्यामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी होऊ लागली आहे. आयपीएलमध्ये याआधीही काही संघांनी ऐन स्पर्धेदरम्यान कर्णधार बदलले होते. 

2008- डेक्कन चार्जर्स

आयपीएलच्या पहिल्या हंगमात डेक्कन चार्जर्सने कर्णधार व्हीव्हीएस लक्ष्मणला काही सामन्यांनंतर कर्णधारपदावरुन बाजूला केलं. लक्ष्मण दुखापतग्रस्त होता. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टला कर्णधार बनवण्यात आलं. गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्सने 2009 मध्ये जेतेपद पटकावलं. 

2013- मुंबई इंडियन्स

ऑस्ट्रेलियाला दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या रिकी पॉण्टिंगकडे मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. पण आयपीएलमध्ये पॉण्टिंगला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. पॉण्टिंगने स्वत: कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल जिंकत इतिहास रचला.

2018- दिल्ली डेअरडेविल्स

कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएलचं जेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरला आपल्या होम-स्टेट दिल्ली डेअरडेविल्सच्या संघासाठी मात्र म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. तो स्वत:ही धावा बनवू शकला नाही आणि संघालाही जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. ऐन हंगामात त्याने कर्णधारपद सोडलं आणि श्रेयस अय्यरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.

2019- राजस्थान रॉयल्स

अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने 2018 च्या हंगामात प्ले ऑफपर्यंत मजल मारली. पण पुढच्या म्हणजे 2019 च्या हंगामात त्याला सुरुवातीलाच पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे व्यवस्थापनाने स्पर्धेच्या मध्यावरच त्याची हकालपट्टी केली आणि स्टिव्ह स्मिथकडे जबाबदारी दिली.

2020- कोलकाता नाइट राइडर्स

कोलकाता नाईट रायडर्सने 2020 च्या हंगातमात विकेटकिपर-फलंदाज दिनेश कार्तिककडे नेतृत्व सोपवलं. पण कर्णधारपदाची जबाबादारी तो नीट सांभाळू शकला नाही. कोलकाता व्यवस्थापनाने त्याला हटवून इंग्लंडच्या इआन मॉर्गेनकडे कर्णधारपद सोपवलं. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये कोलकाताने अंतिम फेरी गाठली होती.

2021- सनरायजर्स हैदराबाद

आयपीएलमधला सर्वात वादग्रस्त प्रकार ठरला तो म्हणजे 2021 च्या हंगमात सनरायजर्स हैदराबादने डेव्हिडि वॉर्नरला कर्णधारपदावून दूर केलं आणि संपूर्ण हंगामातून ड्ऱॉप केलं. त्यानंतर पुढच्या हंगामाआधी त्याला संघातूनच रिलीज केलं. हैदराबादची कमान केन विल्यमसनकडे सोपवण्यात आली.

2022- चेन्नई सुपर किंग्स

2022 च्या आयीपीएल हंगामात एमएस धोनी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रवींद्र जडेजाकडे चेन्नईची कमान सोपवण्यात आली. पण सुरुवातीच्या आठपैकी 6 सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला. आणि पुन्हा एकदा धोनीला चेन्नईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

2024-03-28T12:42:13Z dg43tfdfdgfd