IPL चा स्टार खेळाडू असूनही सुनील नरेन टीम मीटिंगमध्ये येऊ नये असं श्रेयस अय्यरला का वाटतं? म्हणाला, “त्याला अजिबात..”

KKR vs DC Match Highlights: आयपीएल २०२४ मधील सामना ४७वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात नरेन पुन्हा एकदा KKR साठी स्टार खेळाडू ठरला. चार षटकांमध्ये २४ धावा देत त्याने एक विकेट घेतली. तर फलंदाजी करताना फिल सॉल्टसह, सलामीला जाऊन ७९ धावांची भागीदारी केली. एकूणच फलंदाजी- गोलंदाजी अशा दोन्ही पैलूंमध्ये नरेन हा संघासाठी हुकुमी एक्का सिद्ध होत आहे. पण सामन्यानंतर बोलताना कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सुनील नरेन याच्याबाबत एक खास खुलासा केला आहे. नरेन हा संघाच्या बैठकींना उपस्थित राहत नाही असं म्हणताना अय्यर पुढे असंही म्हणाला की, “नरेनने बैठकीला उपस्थित राहूही नये, असं आम्हाला वाटतं”, नेमकं असं म्हणण्याचं कारण काय,चला जाणून घेऊया..

.. म्हणून सुनील नरेन मीटिंगला येऊ नये वाटतं!

केकेआर विरुद्ध डीसी सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यरला असं विचारण्यात आलं की, नरेन आणि सॉल्ट या दोघांना खेळाआधी काही खास सूचना दिल्या होत्या का? ज्यावर अय्यर म्हणाला की, “सनीला अजिबात काही सांगत नाही. फिल एकवेळ टीम मीटिंगसाठी येतो पण नरेन हा पूर्णपणे खेळातच गुंतलेला असतो त्याला खेळताना पाहणं हा निव्वळ आनंद आहे, सध्याचा त्याचा फॉर्म पाहता मी तर असं म्हणेन की त्याने टीम मीटिंगसाठी येऊही नये. तो खेळतोय तसंच खेळावं.” यंदाच्या आयपीएलच्या नऊ सामन्यांमध्ये नरेनने ४१.३३ च्या सरासरीने व १८२.३५ च्या स्ट्राईक रेटने ३७२ धावा केल्या आहेत.

वरुण चक्रवर्ती बरसला आणि डीसीचा संघ वाहून गेला!

दरम्यान, काल केकेआरच्या विजयादरम्यान, वरुण चक्रवर्तीने ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाला १५३/९ पर्यंत रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने आपल्या फिरकीने जादू केली आणि तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. कालच्या विजयासह आता केकेआरला प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यास मदत झाली आहे. चक्रवर्ती विषयी बोलताना कर्णधार अय्यर म्हणाला की, “गेल्या काही सामन्यांमध्ये तो सर्वोत्तम खेळत नव्हता पण आज कदाचित त्याच दडपणाखाली येऊन त्याने कमाल करून दाखवली. पहिल्या सामान्यापासून आमची त्याच्याकडून हीच अपेक्षा होती.”

हे ही वाचा<< विराट कोहलीच्या जिव्हारी लागली ‘ती’ विकेट! चाहत्याने प्रश्न विचारतच एका सेकंदात दिली प्रतिक्रिया, पाहा Video

आयपीएलच्या पॉईंटटेबलवर एक नजर टाकल्यास, आता कालच्या विजयासह KKR १२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर दिल्ली १२ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

2024-04-30T05:08:00Z dg43tfdfdgfd