IPLचा हंगाम सुरू होण्याआधी धोनीचा फेसबुकवरून धक्का; नवा हंगाम, नवी भूमिका; कॅप्टन कुलवर अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली: आयपीएलच्या १७व्या हंगामाला सुरुवात होण्यास २० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. IPL 2024ची पहिली लढत २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएलमधील संघ नव्या हंगामाची तयारी सुरू करत असताना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

धोनी सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात सक्रीय असतो. अशात आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्याआधी त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. धोनीच्या या पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांसोबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. धोनीने पोस्ट मध्ये म्हटले आहे की, नव्या हंगामासाठी आता उत्सुकता वाढली आहे आणि नव्या भूमिकेसाठी देखील, स्टे ट्यून!

पोस्टमध्ये धोनीने म्हटल्या प्रमाणे हा नवा रोल काय असेल याची चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेट करिअरचा एखादा निर्णय आधीच सोशल मीडियावरून शेअर करणाऱ्यांपैकी धोनी नाही. त्यामुळेच त्याच्या या पोस्टची उत्सुकता आणखी वाढली आहे. आतापर्यंत त्याने घेतलेले निर्णय थेट असायचे. यावेळी गोष्ट वेगळी वाटते.

धोनीच्या पोस्टचा चाहते वेगवेगळा अर्थ काढत आहेत. काही जण याचा राजकारणाशी संबंध जोडत आहेत. तर काही जण आयपीएलच्या नव्या हंगामात धोनी नव्या भूमिकेत दिसेल असा अर्थ घेत आहेत. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. सोशल मीडियावर धोनीच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते धोनी कर्णधारपद सोडेल, काहींना वाटते तो सलामीवीर म्हणून फलंदाजीला येईल. तर काहींनी याचा अर्थ त्याच्या राजकीय प्रवेश असा लावला आहे. अर्थात धोनीने म्हटल्या प्रमाणे थोड्या दिवसात नवी भूमिका काय असेल हे स्पष्ट होईल.

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक ५ विजेतेपद मिळवली आहेत. गेल्या वर्षी २०२३मध्ये अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या ५ विक्रमी विजेतेपदाशी बरोबरी केली होती. आता यावर्षी धोनी मुंबईला मागे टाकून सहावे विजेतेपद मिळवणार का याची उत्सुकता आहे. त्याच बरोबर गेल्या काही वर्षापासून धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार याची चर्चा होत आहे. गेल्या वर्षी धोनीचा अखेरचा हंगाम असेल असे बोलले जात होते. पण विजेतेपद मिळाल्यानंतर त्याने आपण आणखी एक वर्ष खेळणार असल्याचे म्हटले होते.

2024-03-04T14:03:27Z dg43tfdfdgfd