IPLच्या गडबडीत जाहीर झाली भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख; कधी आणि कुठे होणार मॅच जाणून घ्या

नवी दिल्ली: भारतात आयपीएल टी-२०चा थरार सुरू आहे. अशाच क्रिकेट चाहत्यांसाठी मंगळवारी दोन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत. मंगळवारी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले. ज्यात टीम इंडिया यावेळी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पाच कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर बातमी आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची होय.

आशियाई क्रिकेट परिषदेने मंगळवारी महिला आशिया कप २०२४चे वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेत भारतीय महिला संघाची पाकिस्तानविरुद्ध लढत होणार आहे. महिला आशिया कप स्पर्धा १९ ते २८ जुलै या काळात श्रीलंकेतील दांबुला येथे होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ असतील. विद्यमान चॅम्पियन भारतीय संघ ग्रुप ए मध्ये असून त्याच्यासोबत पाकिस्तान, नेपाळ आणि युएईचा संघ आहे. ग्रुप बी मध्ये बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका आणि थायलंडचा समावेश आहे.

महिलांच्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत २१ जुलै रोजी होणार आहे. या स्पर्धेत भारताची पहिली मॅच १९ जुलै रोजी युएईविरुद्ध होईल. त्यानंतर पाकिस्तानसोबत लढत होणार आहे. २३ जुलैला भारत आणि नेपाळ याची मॅच होईल. प्रत्येक गुपमधून दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. सेमीफायनलच्या लढती २६ तर अंतिम मॅच २८ जुलैला होणार आहे.

पुरुषांच्या प्रमाणेच महिलांच्या स्पर्धा टी-२० फॉर्मेटमध्ये होणार आहे. भारतीय संघाने सर्वाधिक म्हणजे ७ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. गेल्या वेळी २०२२ मध्ये ही स्पर्धा झाली होती,तेव्हा भारताने श्रीलंकाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या आधी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.

2024-03-26T15:29:45Z dg43tfdfdgfd