ISHAN KISHAN: ईशान किशनकडून झाली आणखी एक मोठी चूक; बीसीसीआय करू शकते कठोर कारवाई

मुंबई: भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ईशान किशनच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधी भारतीय संघातून बाहेर करण्यात आले त्यानंतर बीसीसीआयच्या वार्षिक करारातून त्याला डच्चू दिला. आता हे सर्व झाल्यानंतर ईशानकडून आणखी एक मोठी चूक झाली. ज्यावर बोर्डाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर ईशानला रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले होते. पण त्याने नकार दिला. आता तो डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत खेळत आहे. बऱ्याच दिवसांनी मैदानावर परतलेल्या ईशानला फार खास प्रभाव पाडता आला नाही. फलंदाजीला आल्यावर ईशानने दोन चांगले शॉट खेळले. पण त्यानंतर सर्वांचे लक्ष गेले ते त्याच्या हेल्मेटकडे होय. ईशानने या सामन्यात खेळताना जे हेल्मेट घातले होते त्यावर बीसीसीआयचा लोगो होता. आता हा बेजबाबदारपणा त्याला अडचणीत आणू शकतो.

बीसीसीआयने हेल्मेटच्या वापराबाबत काही कठोर नियम केले आहेत. कोणताही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटच्या सामन्यात बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट आणि भारतीय संघाची जर्सी वापरू शकत नाही. जर एखाद्या खेळाडूला टीम इंडियाकडून मिळालेले हेल्मेट वापरायचे असेल तर तो त्या स्पर्धेत हेल्मेटवरील लोगो झाकून वापरू शकतो. पण ईशानने तसे केले नाही.

या स्पर्धेत खेळणाऱ्या तिलक वर्माने भारतीय संघाकडून मिळालेले हेल्मेट वापरले होते. पण त्याने बीसीसीआयचा लोको झाकून ठेवला होता. ईशानकडून झालेल्या या चूकीवर बीसीसीआयकडून कारवाई केली जाऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ही जबाबदारी जेवढी खेळाडूची असते तितकीच मैदानावरील अंपायरची देखील असते. बीसीसीआयच्या या नियमाचे पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी अंपायरची असते. ईशानच्या प्रकरणात अंपायर्सचे लक्ष नसल्याचे दिसते.

2024-02-29T16:38:01Z dg43tfdfdgfd