MAYANK YADAV: पंजाबच्या हातून हिसकावला विजय! वेगवान गोलंदाजाचे क्रिकेट विश्वातून मोठे कौतुक, काही म्हणाले भारताला मिळाला स्टार

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला प्रश्न विचारण्यात आला की लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध चांगल्या स्थितीत असतानाही संघाला सामना का करावा लागला, तेव्हा त्याने यास मयंक यादवच्या गोलंदाजीला जबाबदार ठरवलं. शिखर धवन म्हणाला की, मयंक यादवने तुफान गोलंदाजीच्या जोरावर आमच्या हातातून सामना हिसकावून घेतला. त्याने पदार्पणातच ताशी १५६किमी वेगाने गोलंदाजी करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. मयंक एक उत्तम यॉर्कर गोलंदाज आहे. याचा प्रत्यय या सामन्यात आला.

मयंक ठरला गेम चेंजर

मयंकची गोलंदाजी बघून त्याच्यावर क्रिकेटच्या सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात पंजाबसमोर 200 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य होते. कर्णधार शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी १० षटकांत १०० धावा केल्या. पण मयंक यादवने आधी बेअरस्टोचा आपले शिकार केले आणि त्यानंतर प्रभसिमरन आणि त्यानंतर जितेश शर्माला लागोपाठ दोन षटकांत बाद करून लखनौसाठी गेम चेंजर स्पेल टाकली. पदार्पणाच्या सामन्यात मयंक यादवने चार षटकात केवळ २७ धावा देत तीन बळी घेतले. मॅचच्या शेवटी मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला गौरविण्यात आले.

प्रशिक्षकांचीही कौतुकाची थाप

दिग्गज माजी गोलंदाज लखनौ सुपरजायंट्सचे गोलंदाजी प्रशिक्षक मारेन मॉर्केल यांनीही मयंक यादवची मनापासून स्तूती केली. गेल्या वर्षी मयंक यादवला दुखापत झाली होती, पण त्याने शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाचा माजी महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने ट्विट करून मयंक यादवचे कौतुक करत त्याला भारताचा पुढचा वेगवान स्टार म्हटले आहे.

मयंकच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने गेल्या वर्षीच्या २३ वर्षांखालील कर्नल सीके नायडूच्या सहा सामन्यात १५ विकेट घेऊन दिल्लीसाठी खळबळ उडवून दिली होती, याशिवाय त्याने बॅटने ६६ धावांचे योगदान दिले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३-२४ च्या चार सामन्यात पाच बळी घेतले. २०२३ देवधर ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकडून खेळताना त्याने पाच सामन्यांमध्ये १७.५८च्या सरासरीने १२ बळी घेतले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-31T04:10:21Z dg43tfdfdgfd