MUMBAI INDIANS CAPTAIN HARDIK PANDYA: मॅचच्या आधी हार्दिक पंड्याचे मोठे वक्तव्य; चाहत्यांबद्दल पाहा काय म्हणाला

मुंबई: आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्सची लढत राजस्थान रॉयल्सविरुद्ध होत आहे. १२ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या राजस्थान पेक्षा ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी ही लढत फार महत्त्वाची असणार आहे. दोन्ही संघात याआधी झालेल्या लढतीत राजस्थानने बाजी मारली होती. तेव्हा मुंबईच्या घरच्या मैदानावर राजस्थानने त्यांचा पराभव केला होता. आता मुंबई त्या पराभवाचा बदला घेणार का याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अशाच संपूर्ण हंगामात चर्चेत राहिलेला मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

गेल्या दोन हंगामात गुजरातचा कर्णधार असलेला हार्दिक या वर्षी मुंबई संघात आला आणि कर्णधार देखील झाला. मुंबई इंडियन्सच्या संघ मालकांचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. त्यामुळेच हार्दिकला ट्रोल केले जाऊ लागले. मैदानावर देखील हार्दिक विरोधात घोषणाबाजी झाली.

फक्त कर्णधार नाही तर एक खेळाडू म्हणून हार्दिकसाठी हा हंगाम अतिशय कठीण ठरला आहे. असे असले तरी हार्दिकने सर्व प्रकारची आव्हाने स्विकारण्याची तयारी केली असून पुढे कसे जाता येईल याचा विचार तो करतोय. आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यात हार्दिकला फार चांगली कामगिरी करून दाखवता आली नाही.

आव्हाने ही गंमतीशीर असतात. मला विचारले तर आव्हाने कोणती असतात? तर फक्त संघा मालकांच्या अपेक्षा किंवा चाहत्यांच्या अपेक्षा याचा माझ्यावर काहीच फरक पडत नाही. मी तणाव आणि व्यस्त आयुष्य जगतोय, त्या अर्थी मी काही तरी काम करतोय, असे हार्दिकने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील एका कार्यक्रमात सांगितले.

काही ही झाले तरी मी हार मानणार नाही. मुंबई इंडियन्स हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. मी माझ्या मर्यादा आणखी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो. अशी आव्हाने घेतोय जी मला पुढे घेऊन जातील, असे हार्दिक म्हणाला.

मुंबई इंडियन्स संघात परत येण्याबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, हे माझ्यासाठी एक कुटुंब आहे. मी मुंबई संघातील मुलगा आहे. या संघात मी मोठा झालो. जेव्हा मी ही जर्सी घातली, जेव्हा त्याची घोषणा झाली तो क्षण माझ्यासाठी फार भावनिक होता. मला फार समाधानी वाटले. कारण,मी पुन्हा घरी आलो होतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-22T10:02:35Z dg43tfdfdgfd