SRH IN FINAL : हैदराबादच्या गोलंदाजांनी फिरवलं वारं, राजस्थानचा पराभव करून थाटात फायनलमध्ये एन्ट्री

Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals : आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (Qualifier 2) यांच्यात चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सचा पराभव केला अन् फायनलमध्ये एन्ट्री (SRH in IPL 2024 Final) केली आहे. त्यामुळे आता हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनलचा मुकाबला होणार आहे. सनराईजर्स हैदराबादने 20 षटकात 9 बाद 175 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आरामात जिंकेल, असं वाटत होतं. मात्र, पॅट कमिन्सच्या आक्रमक प्लॅनसमोर राजस्थानचा संघ धावा धरू शकला नाही अन् हैदराबादने तिसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हैदराबादचा सामना फायनलमध्ये कोलकाताविरुद्ध (KKR vs SRH) होणार आहे.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हैदराबादने खराब सुरुवातीतून सावरले आणि हेनरिक क्लासेनच्या 34 चेंडूत 50 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 9 गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात यशस्वी जयस्वालने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, राजस्थानकडून चांगली सुरूवात झाल्यानंतर एकामागून एक विकेट्स गेल्या. ध्रुव जुरैलने मैदानात पाय रोवले अन् राजस्थानसाठी लढला मात्र, त्याची फिफ्टी देखील निरर्थक ठरली. राजस्थानने 20 षटकांत सात गडी गमावून 139 धावा केल्या. हैदराबादसाठी प्रभावी खेळाडू म्हणून आलेला फिरकीपटू शाहबाज अहमदने उत्कृष्ट गोलंदाजी केली. शाहबाजने तीन विकेट घेतल्याने राजस्थानचा डाव फसला. 

केकेआर विरुद्ध हैदराबाद

राजस्थानचा पराभव केल्यानंतर आता हैदरबाद आणि कोलकाता यांच्यात (KKR vs SRH) आयपीएलची फायनल (IPL 2024 Final) होणार आहे. येत्या 26 मे रोजी चेन्नईच्या चेपॉकवर सामना होणार आहे. क्वालिफार 1 मध्ये केकेआरने हैदराबादचा पराभव केला होता. त्याचा बदला घेऊन हैदराबाद आयपीएल जिंकणार का? असा सवाल विचारला जातोय.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.

2024-05-24T18:03:12Z dg43tfdfdgfd