SURYAKUMAR YADAV IPL 2024: सूर्यकुमार यादवच्या पोस्टमुळे मुंबई इंडियन्स संघाला घाम फुटला, चाहत्यांची धाकधूक वाढली

मुंबई: आयपीएलचा १७वा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपदाची सूत्रे हार्दिक पंड्याकडे देण्यात आली आहेत. संघातील हा बदल चाहत्यांना आवडला नाही. अशाच आता आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फिटनेसमुळे मुंबई इंडियन्सची काळजी वाढली आहे.सूर्याच्या दुखापतीवर भारतीय क्रिकेट बोर्डाकडून अद्याप मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला अपडेट मिळाले नाहीत.

सूर्यकुमार यादव या हंगामात खेळणार की नाही अशी चर्चा सुरू असताना स्वत: सूर्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टेटसला एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये सूर्याने तुटलेले हृदय टाकले आहे. त्याच्या या पोस्टवरून आता चाहत्यांची धाकधुक आणखी वाढली आहे.

तुटलेल्या हृदय या पोस्टमधून सूर्याला नेमके काय म्हणायचे आहे हे अद्याप समजले नसले तरी याचा अर्थ अनेक जण तो IPLच्या हंगामाला मुकणार आहे की काय असा घेत आहेत. याबाबत मुंबई इंडियन्स किंवा बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट आले नाहीत. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची पहिली मॅच गुजरातविरुद्ध २४ मार्चला अहमदाबाद येथे होणार आहे.

सूर्यकुमारला हर्नियाची दुखापत असून तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डिसेंबरमध्ये झालेल्या टी-२० मालिकेपासून मैदानाबाहेर आहे. ३३ वर्षीय सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्सच्या संघातील मधळ्या फळीतील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. हातातून निसटत चाललेल्या अनेक सामन्यात सूर्याने मुंबई इंडियन्सला एकहाती विजय मिळून दिला आहे. आयपीएलच्या १२४ सामन्यात त्याने ३ हजार २४९ धावा केल्या आहेत. यात एका नाबाद शतकाचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२४च्या पहिल्या टप्यातील लढती

२४ मार्च- गुजरात विरुद्ध मुंबई इंडियन्स- रात्री ७.३० वाजता, अहमदाबाद

२७ मार्च- हैदराबाद विरुद्ध मुंबई- रात्री ७.३० वाजता, हैदराबाद

०१ एप्रिल- मुंबई विरुद्ध राजस्थान- रात्री ७.३० वाजता, मुंबई

०७ एप्रिल- मुंबई विरुद्ध दिल्ली- दुपारी ३.३० वाजता, मुंबई.

2024-03-19T10:12:56Z dg43tfdfdgfd