TEAM INDIA JERSEY: भगवी बाजू, कॉलरवर तिंरगा, विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच, पहा फोटो

टी-२० विश्वचषक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असून काही तासांपूर्वीच भारतीय संघाची जर्सी लीक झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे, पण आता संघाची जर्सीही लाँच करण्यात आली आहे. भारतीय संघाची जर्सी जागतिक क्रीडा कपड्यांचा ब्रँड Adidas द्वारे तयार केली जाते. आता 'Adidas India' ने इंस्टाग्रामवर ग्राफिक्सच्या माध्यमातून भारतीय संघाची जर्सी अधिकृतपणे लाँच केली आहे. रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाही दिसत आहेत.

२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपसाठी जर्सीचा पुढचा भाग निळा ठेवण्यात आला आहे. हात केशरी रंगाचे ठेवण्यात आले असून खांद्यावर तिरंग्याचे पट्टे लावण्यात आले आहेत. पुढील आणि मागील भाग निळ्या रंगाचे आहेत. ड्रीम ११ हा भारतीय क्रिकेट संघाचा बराच काळ टायटल स्पॉन्सर आहे. त्यामुळे जर्सीच्या पुढच्या बाजूला मोठ्या अक्षरात 'DREAM 11' लिहिलेले आहे आणि त्याखाली INDIA छापले आहे. जर्सी लाँच होण्यापूर्वीच त्याचा फोटो सोशल मीडियावर लीक झाला होता. आता आदिदासनेही जर्सी जारी केली आहे.

दरम्यान पुढील महिन्यात टी-२० विश्वचषक होणार आहे. टी-२० ची ही सर्वात मोठी स्पर्धा आयपीएलनंतर लगेच सुरू होईल. या स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे केले आहे. भारतीय क्रिकेट संघाने याआधीच १५ खेळाडूंचा संघ निवडला असून त्यात काही आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. फलंदाज म्हणून सातत्याने आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात स्थान मिळालेले नाही, तर गिल आणि बिश्नोईही बाहेर आहेत.

टी-२० विश्वचषकात भारतीय संघ अ गटात पाकिस्तानसोबत आहे. अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड हेही या गटात आहेत. ५ जून रोजी भारतीय संघ पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर ९ जून रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर भारताचा सामना १२ तारखेला अमेरिकेशी आणि १५ तारखेला कॅनडाशी होणार आहे. २६ आणि २७ जून रोजी उपांत्य फेरी तर २९ रोजी अंतिम फेरी होणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-06T14:37:07Z dg43tfdfdgfd