अति हुशारी महागात पडली; आऊट होण्याची ही कोणती पद्धत, यशस्वीने स्वत:ची विकेट केली गिफ्ट

जयपूर: आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत सुरू आहे. गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानकडून रियान पराग आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात त्यांनी १९६ धावा केल्या.

या सामन्यात नेहमी प्रमाणे राजस्थानच्या डावाची सुरूवात जोश बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली. मॅचच्या पाचव्या ओव्हरमध्ये उमेश यादवच्या गोलंदाजीवर यशस्वी बाद झाला. यशस्वी ज्या पद्धतीने बाद झाला आता त्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या यशस्वीकडे या सामन्यात देखील सर्वांची नजर होती. यशस्वीने १८ चेंडूत ५ चौकारांसह २४ धावा देखील केल्या होत्या.

उमेश यादवच्या पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एक स्कूप शॉट मारण्याच्या प्रयत्नात यशस्वीने विकेटकीपरच्या हातात चेंडू दिला.यशस्वीने मारलेल्या शॉटवर विकेटकीपर मॅथ्यू वेडने हवेत उडी मारून चेंडू पकडला. यशस्वी अशा प्रकारचा शॉट शक्यतो खेळत नाही. पण यावेळी त्याच्याकडून झालेला प्रयोग अपयशी ठरला आणि १९ चेंडूत २४ धावा करून त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले.

आयपीएलच्या आधी भारतीय संघाकडून खेळताना यशस्वीने शानदार फलंदाजी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वीच्या फलंदाजीचे कौतुक झाले होते. पण आयपीएलच्या १७व्या हंगामात त्याने ५ सामन्यात ४६ चेंडूत ६३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १२६० इतकी असून स्ट्राइक रेट १३६.९५ इतका आहे. यशस्वीची सर्वोत्तम धावसंख्या २४ इतकी आहे.

राजस्थानकडून रियान परागने पुन्हा एकदा वादळी फलंदाजी केली. त्याने ४८चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकांच्या मदतीने ७६ धावा कुटल्या. तर कर्णधार संजूने ३८ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ६८ धावांची खेळी केली. हेटमायरने ५ चेंडूत १३ धावांचे योगदान दिले. राजस्थान हा आयपीएलमधील आतापर्यंतचा अपराजित संघ आहे. त्यांनी ४ पैकी ४ लढती जिंकल्या असून ते गुणतक्तात अव्वल स्थानी आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-10T16:49:13Z dg43tfdfdgfd