अश्विनचे १०० व्या कसोटी सामन्यात शतक, अजून एक भन्नाट विक्रम केला आपल्या नावावर

दिगंबर शिंगोटे : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने इंग्लंडविरुद्धच्या धरमशाला कसोटी क्रिकेट सामन्याद्वारे आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. त्याने आपला शंभरावा कसोटी सामना एका आगळ्या शतकासह साजरा केला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका झाली. यात भारतीय संघाने ४-१ अशी बाजी मारली. यातील अखेरचा अर्थात पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे झाला. हा अश्विनचा शंभरावा कसोटी सामना होता. अर्थात, मैदानात दाखल होताच. त्याने एक ‘शतक’ पूर्ण केले होते. त्यापाठोपाठ, या कसोटीतील पहिल्या डावात अश्विनने चार विकेट घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ अश्विनने दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. अर्थात, त्याने पाच विकेट घेतल्या. यावेळी त्याने सलामीवीर झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, कर्णधार बेन स्टोक्स आणि बेन फोक्स यांना परतीचा मार्ग दाखवला. यात स्टोक्स, फोक्स आणि डकेटचा अश्विनने त्रिफळा उडवला.

या कसोटीत अश्विनने एकूण नऊ विकेट घेतल्या. या नऊ विकेटसह त्याने इंग्लंडविरुद्ध मायदेशात बळींचे शतकही साजरे केले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फिरकीपटू ठरला. तसेच, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये केवळ दोनच गोलंदाजांना मायदेशात एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध बळींचे शतक साजरे करता आले होते. हे दोन्ही वेगवान गोलंदाज असून, ते दोन्ही गोलंदाज इंग्लंडचे आहेत. याबाबतीत इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आघाडीवर आहे. मायदेशात ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५ कसोटी क्रिकेट सामन्यांत २६.६५च्या सरासरीने १०६ विकेट घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ, जेम्स अँडरसन आणि आता रविचंद्रन अश्विन आहे.

इंग्लंडच्या अँडरसनने मायदेशात भारताविरुद्ध २२ कसोटी सामन्यांत २३.४६ च्या सरासरीने १०५ विकेट घेतल्या आहेत. मायदेशात अश्विनने इंग्लंडविरुद्ध १८ कसोटी सामन्यांत २७.००च्या सरासरीने १०० विकेट घेतल्या आहेत. भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. मात्र, त्याला मायदेशात कांगारूंविरुद्ध बळींचे शतक साजरे करता आले नव्हते. त्याने मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौदा कसोटींत २५.४३च्या सरासरीने ८६ विकेट घेतल्या होत्या.

2024-03-09T13:31:56Z dg43tfdfdgfd