आतापर्यंत झाले ते काहीच नाही; मुंबई इंडियन्स समोर खरे आव्हान तर आता सुरु होणार, पुढील ४ लढती ठरणार निर्णायक

मुंबई: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचा १७व्या हंगामात आणखी एका लढतीत पराभव झाला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा वानखेडे म्हणजे घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत व्हावे लागले. रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीनंतर मुंबईचा पराभव झाल्याने तो चाहत्यांना अधिक बोचणारा ठरला.

चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे ६ सामन्यातील २ विजय आणि ४ पराभवासह ४ गुण झाले आहेत. त्यांचे नेट रनरेट वजा ०.२३४ इतके असून ते गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावर आहेत. आतापर्यंत झालेल्या ६ पैकी ४ लढती मुंबईने घरच्या मैदानावर खेळल्या आहेत. पहिल्या दोन लढती त्यांनी अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये खेळल्या होत्या. या दोन्ही लढतीत पराभव झाल्यानंतर घरच्या मैदानावर देखील त्यांना ४ पैकी २ लढती गमवण्याची वेळ आली. आधी राजस्थान रॉयल्सने आणि काल चेन्नईने त्यांचा पराभव केला.

मुंबई इंडियन्स संघासमोरचे खरे आव्हन आता पुढील ४ सामन्यांचे आहे. कारण मुंबईला पुढील चार लढती बाहेरच्या मैदानावर खेळायच्या आहेत. यातील पहिली लढत पंजाबविरुद्ध चंदीगड, दुसरी राजस्थान विरुद्ध जयपूर, तिसरी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दिल्लीत आणि चौथी लढत लखनौविरुद्ध लखौनच्या मैदानावर होणार आहेत. ज्या संघाला घरचा गड राखता आला नाही त्यांची बाहेरच्या मैदानावर काय अवस्था होईल या विचारानेच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या पोटात गोळा आला असेल.

या हंगामात मुंबईला अजून ८ सामने खेळायचे आहेत त्यापैकी ३ लढती वानखेडेवर असणार आहेत तर अन्य ५ मॅच बाहेरच्या मैदानावर खेळावे लागतील. संघाला प्लेऑफचे तिकीट पक्के करायचे असेलतर पुढील सर्व लढती जिंकाव्या लागतील आणि नेट रनरेट देखील चांगले ठेवावे लागले. असे झाले तर मुंबईचे २० गुण होतील. पण संघाचे सध्याची कामगिरी पाहता असे होईल याची हमी देता येणार नाही. घरच्या मैदानावर होणाऱ्या ३ पैकी ३ लढती जिंकून त्यांना अन्य मैदानावर होणाऱ्या ५ पैकी किमान ३ लढती जिंकाव्या लागतील. जेणेकरून ८ पैकी ६ लढती जिंकून मुंबईचे १६ गुण होतील.

आयपीएलचा इतिहास पाहता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी १६ गुण पुरेसे ठरतात. पण या ठिकाणी नेट रनरेट देखील महत्त्वाचे ठरू शकते. एकूण मुंबईसाठी हा हंगाम कठीण झाला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-15T13:36:29Z dg43tfdfdgfd