आयपीएलआधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त, संघाचं टेन्शन वाढलं

मुंबई इंडियन्स संघ २४ मार्च रोजी आयपीएलच्या १७ व्या हंगामात आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्याचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सशी होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात त्याच्या दोन दिवस आधी २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होईल. स्पर्धेपूर्वी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. संघाला सुरुवातीचे काही सामने नवीन वेगवान गोलंदाजाशिवाय खेळावे लागणार आहेत.

श्रीलंकेचा युवा स्टार दिलशान मदुशंका दुखापतग्रस्त झाला असून तो आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर असल्याची बातमी आली आहे. मात्र, तो काही सामन्यांमध्ये खेळणार नाही की संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडणार हे निश्चित नाही. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान मदुशंकाला दुखापत झाली. तो मालिकेबाहेर आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने रविवारी मधुशंकाच्या दुखापतीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, वेगवान गोलंदाजाच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. पुनर्वसनासाठी तो घरी परतणार आहे.

दरम्यान आयपीएल लिलावात मधुशंकाला मुंबई इंडियन्सने ६.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने ९ सामन्यात २१ बळी घेतले होते. मात्र, मुंबई इंडियन्सकडे गोलंदाजीच्या पर्यायांची कमतरता नाही. संघात जसप्रीत बुमराह, बेहरेनडॉर्फ, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारासारखे वेगवान गोलंदाज आहेत. तुषाराची ॲक्शन मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगासारखी आहे. अलीकडे काही टी-२० लीगमध्ये त्याने प्राणघातक गोलंदाजी केली आहे. अशा परिस्थितीत त्याला संधी मिळू शकते.

2024-03-17T13:53:15Z dg43tfdfdgfd