आर अश्विनचा आणखी एक धमाका,झाला जगातील अव्वल गोलंदाज; हिटमॅन रोहित शर्मा टॉप १०मध्ये परतला

दुबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका भारताने ४-१ अशी जिंकली. या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना हा भारताचा स्टार आणि अनुभवी जलद गोलंदाज आर अश्विनचा १००वा कसोटी सामना होता. या सामन्यात अश्विनने ९ विकेट घेऊन विक्रमी कामगिरी केली. कसोटीच्या पदार्पणात आणि १००व्या कसोटीत पाच विकेट घेण्याची कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला होता. या विक्रमी कामगिरीनंतर अश्विनसाठी आणखी एक गुड न्यूज आली आहे.

आयसीसीने बुधवारी नवी क्रमवारी जाहीर केली. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विनने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. अश्विन सोबत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला देखील ताज्या क्रमवारीत फायदा झालाय.

धरमशाला येथील पाचव्या कसोटीत अश्विनने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या होत्या. डावात ५ विकेट घेण्याची ही त्याची ३६वी वेळ होती. गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन ८७० गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड असून त्याचे ८४७ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे, त्याचे देखील ८४७ इतके गुण आहेत. टॉप १० मध्ये रविंद्र जडेजा हा सातव्या स्थानावर आहे. मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला क्रमवारीत मोठा फायदा झाला असून तो करिअरमधील सर्वोत्तम अशा १६व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत शतकवीर रोहित शर्माला फायदा झाला. पाचव्या कसोटीआधी टॉप १०च्या बाहेर असलेला रोहित आता सहव्या स्थानावर पोहोचला आहे. अव्वल स्थानी न्यूझीलंडचा केन विलियमसन आहे. रोहितचे ७५१ गुण आहेत. टॉप १० मध्ये भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल ८व्या स्थानावर आहे. संपूर्ण मालिकेला मुकावे लागलेल्या विराट कोहली ९व्या स्थानावर घसरला आहे. शुभमन गिलला या क्रमवारीत फायदा झाला असून तो ११ स्थानांनी पुढे येत २०व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऑलराउंडरच्या यादीत रविंद्र जडेजा ४४४ गुणांसह अव्वल तर आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विनचे ३२२ इतके गुण आहेत.

2024-03-13T11:42:25Z dg43tfdfdgfd