आरसीबीच्या विराट विजयात जॅक्स चमकला, गुजरातची धुलाई करत चार षटकं राखून सामना जिंकला

अहमदाबाद : विल जॅक्स आणि विराट कोहली यांच्या तुफानी खेळींच्या जोरावर आरसीबीने गुजरात टायटन्सवर ९ विकेट्स आणि तब्बल २५ चेंडू राखून मोठा विजय साकारला. गुजरातच्या संघाने आरसीबीपुढे विजयासाठी २०१ धावांचे आव्हान ठेवले होते. विराट कोहलीने सुरुवातीला दमदार फलंदाजी करत विजयाचा पाया रचला आणि त्यावर विलने कळस चढवला. विलने यावेळी ४१ चेंडूंत पाच चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर नाबाद १०० धावांची वादळी खेळी साकारली. विराट कोहलीने नाबाद ७० धावा करत जॅकला चांगली साथ दिली.

गुजराच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीची संघ मैदानात उतरला आणि विराट कोहलीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. विराट आक्रमक खेळत आहे, असे वाटत होते. पण जेव्हा जॅक्स फलंदाजीला आला तेव्हा विराटची खेळी पुन्हा एकदा संथ वाटायला लागली. कारण जॅक्सने टी-२० स्टाईलमध्ये धमाकेदार फटकेबाजी केली, त्यावेळी विराटची फलंदाजी ही वनडे स्टाईल वाटत होती.

आरसीबीने टॉस जिंकला आणि गुजरातच्या संघाला पहिल्याच षटकात धक्का दिला. आरसीबीच्या स्वप्निल सिंगने वृद्धिमान साहाला ५ धावांवर बाद केले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने गुजरातच्या संघाला चांगली धावगती मिळवून दिली. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेमध्ये गुजरातची १ बाद ४२ अशी स्थिती होती. त्यानंतर शुभमन गिल यावेळी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. कारण ग्लेन मॅक्सवेलने त्याला बाद केले. गिलला यावेळी १६ धावा करता आल्या. गिल बाद झाला आणि त्यानंतर साई आणि शाहरुख खान यांची चांगलीच जोडी जमल्याचे पाहायला मिळाले.

शाहरुख खानने ३० चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५८ धावांची दमदार खेळी साकारली. मोहम्मद सिराजने शाहरुख खानची ही खेळी संपुष्टात आणली. पण त्यानंतर साईने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती समर्थपणे पेलवली. साईच्या धडाकेबाज फटकेबाजीमुळेच गुजरातच्या संघाला २० षटकांत २ बाद २०० धावा करता आल्या. साईने यावेळी ४९ चेंडूंत ८ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ८४ धावांची खेळी साकारली.

साई सुदर्शन हा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. या सामन्यातही त्याने गुजरातसाठी दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-28T13:35:40Z dg43tfdfdgfd