आरसीबीला सामन्यांवर का सोडावे लागणार पाणी, जाणून घ्या असं घडलं तरी काय...

गोपाळ गुरव : आरसीबीच्या संघाला एकिकडे चांगली कामगिरी करता आलेली नाही, दुसरीकडे आता त्यांचे सामनेच रद्द होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाच्या आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सात लढती बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. यापैकी तीन लढती झाल्या आहेत. उर्वरित चार लढती इतरत्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे कारण समोर आले आहे.

यंदा आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक दोन टप्प्यांत जाहीर करण्यात आले. याला कारण म्हणजे देशातील लोकसभेच्या निवडणुका. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि बीसीसीआयने पूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या नुसार बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामीवर यंदाच्या आयपीएलमधील सात लढती होणार आहेत. यातील बेंगळुरूच्या पंजाब, कोलकाता आणि लखनौविरुद्धच्या लढती झाल्या आहेत. आता उर्वरित लढती येथे होण्याची शक्यता मी झाली आहे. त्याला कारण म्हणजे सध्या बेंगळुरूवासियांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. तिथे दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. एकीकडे पाणी टंचाई असताना, दुसरीकडे क्रिकेटच्या मैदानासाठी पाणी का द्यायला हवे, अशी ओरड स्थानिकांनी सुरू केली आहे. पाण्यापेक्षा क्रिकेट काय, काहीच महत्त्वाचे नाही, अशी भूमिका तेथील नागरिकांनी घेतली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरातील पाण्याचे संकट वाढत असताना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इतर राज्य प्राधिकरणांना एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राज्य क्रिकेट असोसिएशन व्यतिरिक्त, ‘एनजीटी’ने बेंगळुरू पाणी पुरवठा, मलनिस्सारण मंडळ आणि कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दोन मेपर्यंत पाण्याचे प्रमाण आणि स्त्रोत याबद्दल तपशील सादर करण्यास सांगितले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमला आयपीएल सामन्यांसाठी शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर न्यायाधिकरणाने स्वत:हून दखल घेतली आहे. बेंगळुरूच्या लढतींसाठी १५ हजार लीटर पाणी वापरले जात आहे. दुसरीकडे, कर्नाटक सरकारने बागकाम आणि वाहने धुणे यासारख्या विविध कारणांसाठी पिण्यायोग्य पाणी वापरण्यावर कठोर बंदी घातली आहे. त्यात शुद्ध पाणी क्रिकेटसाठी वापरले जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेंगळुरूत पाण्याचे संकट गहिरे होत आहे.

बेंगळुरूत आता १५ एप्रिलला बेंगळुरू वि. हैदराबाद, ४ मे रोजी बेंगळुरू वि. गुजरात आणि १२ मे रोजी बेंगळुरू वि. दिल्ली या लढती होणार आहेत.

लढती पुण्यात घेण्याची मागणी

महाराष्ट्रात पाणी टंचाई असताना पुण्यातील सामने इतरत्र हलविण्यात आले होते. त्यात धर्तीवर बेंगळुरूतील लढती इतरत्र घ्या, असे सांगितले जात आहे. यात मागील महिन्यातच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने बीसीसीआयला बेंगळुरूतील लढती पुण्यात घेण्यासाठी विनंती अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले होते. मात्र, कर्नाटकाने पाणी टंचाईची गंभीर समस्या असतानाही सामन्यांसाठी पाणी पुरवण्याची तयारी दाखवली होती. आता सामाजिक संघटना आवाज उठवित असल्याने पुन्हा पुणेकरांना आयपीएलच्या किमान तीन लढती तरी पुण्यात होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-05T14:28:20Z dg43tfdfdgfd