ऋतुराज-शिवमची धुलाई दाखवायचे सोडून कॅमेरामनने धोनीवर केला फोकस; MSDने पाण्याची बाटली फेकत दिली 'धमकी'

चेन्नई: आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. चेन्नईने उभा केलेल्या २१० धावांचा डोंगर लखनौने सहज पार केला. या लढतीतील एका व्हिडिओची मात्र चर्चा सुरू आहे.

चेन्नईची मॅच असते तेव्हा सर्व चाहत्यांना एकच प्रतिक्षा असते ती म्हणजे धोनी कधी फलंदाजीला येणार. चेन्नईच्या विकेट पडू लागल्या की कॅमेरामन ड्रेसिंग रुममध्ये उभा असलेल्या धोनीकडे कॅमेरा घेतात. काल चेपॉकवर एका बाजूला शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड गोलंदाजांची धुलाई करत होते तेव्हा कॅमेरा धोनीवर फोकस झाला. आणि त्यानंतर जे काही झाले ते मजेशी होते.

आयपीएलमधील चेन्नईच्या लढतीत कॅमेरामनला याची चांगली कल्पना असते की, चाहत्यांना धोनीला पाहण्याची फार इच्छा असते. त्यामुळेच मॅच दरम्यान अनेक वेळा कॅमेरा सीएसकेच्या ड्रेसिंग रुमवर असतो. आणि जेव्हा जेव्हा धोनी मोठ्या स्क्रीनवर दिसतो तेव्हा तेव्हा चाहते जल्लोष करतात. लखनौविरुद्ध दुबे आणि गायकवाडची फलंदाजी सुरू असताना जेव्हा कॅमेरा धोनीवर गेला तेव्हा तो काहीसा नाराज झाला.

कॅमेरा जसा धोनीवर गेला त्याने हातातील पाण्याच्या बॉटलने ती फेकून मारण्याचा इशारा केला. जोपर्यंत धोनी काही करेल तोपर्यंत कॅमरामनने फोकस हटवला. धोनीने गंमतीने केलेली ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बऱ्याच काळावधीनंतर धोनी चेन्नईच्या घरच्या मैदानावर फलंदाजीला आला. त्याने डावातील अखेरचा चेंडू खेळला आणि त्यावर चौकार मारला. दरम्यान या लढतीत ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी केली. आयपीएसच्या इतिहासात चेन्नईच्या कर्णधाराने शतक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याने नाबाद १०८ धावा केल्या. तर दुबेने ६६ धावांची खेळी केली. या जोडीने १०४ धावांची भागिदारी केली. ज्यामुळे चेन्नईला २१०पर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून २०१० साली धोनी आणि बद्रीनाथ यांनी नाबाद १०९ धावांची तर २०१४ साली धोनी आणि माइक हसी यांनी नाबाद १०८ धावांची भागिदारी केली होती.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-24T09:54:40Z dg43tfdfdgfd