ऋषभ पंतला पराभवानंतर बसला मोठा धक्का, बीसीसीआयने केली कडक कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला केकेआरकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला एक मोठ धक्का बसला आहे. पंतकडून एक मोठी चूक घडली असून त्याने आपली ही चूक मान्यही केली आहे. या चुकीनंतर बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केल्याचे आता समोर आले आहे.

कोलकाताच्या संघाने दिल्लीसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तर देताना दिल्लीची ४ बाद ३३ अशी अवस्था झाली. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी झुंज दिली. मात्र, अखेरीस दिल्लीचा डाव १६६ धावांत आटोपला. पंतने २५ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांसह ५५ धावांची, तर स्टब्सने ३२ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. पंतच्या अर्धशतकानंतरही दिल्लीचा सामना गमवावा लागला. पंत चांगल्या फॉर्मात असला तरी त्याला आता एक मोठा धक्का बसला आहे. कारण बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केली आहे.

दिल्लीच्या संघाला बुधवारी पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. मैदानात दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना दुसरीकडे पंतला क्षेत्ररक्षण लावताना जास्त वेळही लागत होता. त्यामुळे गोलंदाजीला जास्त वेळ लागत होता. या सर्व गोष्टी घडत असताना दिल्लीच्या संघाला निर्धारीत वेळेत २० षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे सामना संपल्यावर दिल्लीच्या संघाची चूक त्यांना दाखवण्यात आली. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला संघाची ही चूक दाखवली गेली. त्यानंतर पंतने आपली ही चूक मान्य केली. त्यानंतर ऋषभ पंतवर २४ लाखांचा दंड लावण्याची कारवाई बीसीसीआच्या नियमानुसार करण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण संघातील खेळाडूंच्या मानधनातून २५ टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे. दिल्लीच्या संघाकडून ही गोष्ट दुसऱ्यांदा घडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या संघाने अजून एकदा ही चूक केली तर त्यांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत यांना अशी चूक पुन्हा करून नक्कीच चालणार नाही.

सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल यांची तडाखेबंद फलंदाजी आणि वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्स संघाने बुधवारी आयपीएल क्रिकेट सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघावर १०६ धावांनी विजय नोंदवला. सलग तिसऱ्या विजयासह कोलकाता संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोचला. गेल्या दोन सामन्यांत कोलकाता संघाने बेंगळुरू आणि हैदराबाद संघांना हरवले होते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-04T08:29:58Z dg43tfdfdgfd