एकच वादा सूर्या दादा... तुफानी फटकेबाजी करत मुंबईसाठी रचला धावांचा डोंगर

मोहाली : सूर्यकुमार यादव खेळायला लागला की गोलंदाजांना कसं लोटांगण घालायला लावतो, याचा उत्तम वस्तुपाठ पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कारण सूर्याने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि मुंबईसाठी धावांचा डोंगर रचला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी तुफानी फटकेबाजी करत पंजाबच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. रोहित मोठी खेळी साकारू शकला नाही, पण सूर्याने ती कमी भरून काढली. कारण सूर्याने अर्धशतक तर झळकावले, पण त्याचबरोबर मुंबईची धावगती चांगलीच वाढवली. सूर्याच्या ७८ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यावेळी १९२ धावांचा डोंगर उभारला.

पंजाबने यावेळी टॉस जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. रोहित शर्माने मुंबईच्या संघाला झोकात सुरुवात करून दिली. पण ईशन किशनच्या रुपात मुंबईच्या संघाला पहिला धक्का बसला. ईशानला यावेळी ८ धावा केल्या. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची चांगलीच जोडी जमली. यावेळी रोहित शर्माला पाचव्या षटकात पंचांनी बाद दिले होते. पण रोहितने यावेळी डीआरएस घेतला आणि त्याला जीवदान मिळाले. त्यावेळी रोहित हा १७ धावांवर खेळत होता. त्यानंतर रोहित शर्मा फटकेबाजी करण्याच्या तयारीत दिसत होता. पण त्यावेळी गिअर टाकला तो सूर्याने. कारण सूर्याने त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. सूर्या रोहितनंतर फलंदाजीला आला असला तरी त्याने प्रथम अर्धशतक झळकावले. पण रोहितला मात्र अर्धशतक पूर्ण करता आले नाही.

रोहित शर्मा यावेळी मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि चेंडूने त्याच्या बॅटची कडा घेतली. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने यावेळी कोणतीही चूक न करता रोहित शर्माची कॅच पकडली. रोहितने यावेळी २ चेंडूंत आणि तीन षटकारांच्या जोरावर ३६ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर सूर्या शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण सूर्याला यावेळी शतक झळकावण्यात अपयश आले. सूर्याने यावेळी ५३ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७८ धावांची धमाकेदार खेळी साकारली.

सूर्याची खेळी मुंबईच्या डावाला आकार देणारी ठरली. सूर्या बाद झाल्यावर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला. अखेरच्या षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केली आणि धावांचा डोंगर उभारला. हार्दिक पंड्याला १० धावा करता आल्या, तर टीम डेव्हिडने १४ धावा केल्या. पण तिलक वर्माने दमदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-18T15:55:18Z dg43tfdfdgfd