एकदा नाही तर दोनदा सारखीच चूक, RR VS GT सामना सुरु असताना घडलं तरी काय जाणून घ्या...

दिगंबर शिंगोटे : राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला होता. पण हा सामना रंगात आला असताना एकच चुक चक्क दोनदा घडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच या सामन्याला वेगळे वळण मिळाले.

राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलमध्ये एकही लढत गमावली नव्हती. या यशात रियान परागचा वाटा मोठा होता. राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामन्यात रियान परागला गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने एकदा नव्हे दोनदा जीवदान दिले. त्याची किंमत अखेर गुजरात टायटन्सला मोजावी लागली.

राजस्थान रॉयल्स संघ यंदा जबरदस्त फॉर्मात आहे. यंदाच्या मोसमात राजस्थानने आपल्या पहिल्या चारही लढती जिंकल्या होत्या. यात रियान परागने मोलाचा वाटा उचलला. त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध २९ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांसह ४३ धावांची, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४५ चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद ८४ धावांची, मुंबई इंडियन्सविरुद्ध ३९ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ५४ धावांची खेळी केली होती. बेंगळुरूविरुद्ध तो चार धावा करून परतला होता. या वेळी गुजरातला त्याला लवकर माघारी पाठवण्याची संधी होती. ‘कॅचेस विन मॅचेस’ असे म्हटले जाते. मात्र, मॅथ्यू वेडला संधी साधता आली नाही. सहाव्या षटकात रशीद खानच्या गोलंदाजीवर रियान परागच्या बॅटची कड चेंडूला लागली होती. मात्र, वेडला झेल घेता आला नाही. त्या वेळी रियान परागने खातेही उघडले नव्हते. त्यानंतर, पुन्हा एकदा वेडला संधी मिळाली होती. आठव्या षटकात रशीद खानच्याच गोलंदाजीवर पुन्हा एकदा रियान परागच्या बॅटची कड चेंडूला लागली. मात्र, या वेळीही वेडला संधी साधता आली नाही. त्या वेळी रियान पराग सहा धावांवर खेळत होता.

या जीवदानाचा मोठा फटका गुजरातला बसला. कारण, रियान पराग बाद झाला असता तर राजस्थानची ३ बाद ५१ अशी स्थिती झाली असती. रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ चेंडूंत १३० धावांची भागीदारी रचली. त्या जोरावरच राजस्थान संघ दोनशे धावांच्या समीप पोचला. यात रियान परागने ४८ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह ७६ धावांची खेळी केली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-11T11:46:22Z dg43tfdfdgfd