कोण आहेत मुंबईचे रणजी विजेते प्रशिक्षक ओंकार साळवी, ऐतिहासिक विजयाचे ठरले शिल्पकार

मुंबई : रणजी स्पर्धेत मुंबईने ऐतिहासिक विजय साकारला. मुंबईच्या या ४२ व्या विजयाचे शिल्पकार ठरले ते प्रशिक्षक ओंकार साळवी. कारण आतापर्यंत ओंकार यांच्या नावाची कधीही चर्चा नव्हती. ओंकार हे प्रसिद्धीच्या वलयात कधीही नसतात. प्रसारमाध्यमांशी ते बोलत नाहीत. पण आपल्या कतृत्वाच्या जोरावर त्यांनी मुंबईच्या संघाला जेतेपद मिळवून दिले आहे.

ओंकार साळवी हे काही अचानक मुंबईच्या रणजी संघाचे प्रशिक्षक झालेले नाहीत. यापूर्वी त्यांनी मुंबईसाठी चांगलाच घाम गाळला आहे. यापूर्वी मुंबईच्या रणजी संघाचे ते गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यावेळी त्यांनी मुंबईच्या गोलंदाजीच्या तंत्रात बरेच बदल केले. ओंकार हे क्रिकेटमधील तांत्रिक बदलांसाठी जास्त ओळखले जातात. नवीन तंत्रज्ञान त्यांना अवगत आहे आणि खेळाडूंकडून एखादी गोष्ट करवून घेण्याचे कसबही त्यांच्याकडे आहे. मुंबईने अमोल मुझुमदारसारख्या दिग्गज खेळाडूने रणजीचे प्रशिक्षकपद दिले होते. पण पुढच्या वर्षी मुंबईचा प्रशिक्षक कोण, असा प्रश्न विचारला जात होता. त्यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेकडे बरेच अर्ज आले होते. यामध्ये समीर दिघे यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचाही समावेश होता. पण त्यावेळी एक अशी गोष्ट घडली की, प्रशिक्षकपदाच्या निर्णयावर शिक्कामोर्तबच झाले.

यापूर्वी ओंकार मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंना ते चांगलेच माहिती होती. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंनीच संघटनेकडे ओंकार साळवी यांना प्रशिक्षक बनवा, अशी विनंती केली होती. त्यामुळे ओंकार साळवी यांना मुंबईच्या रणजी संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले. ओंकार हे आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षकही आहेत. ओंकार यांची अजून एक ओळख आहे. भारताकडून खेळणाऱ्या अविष्कार साळवी यांचे ते बंधू आहेत. अविष्कार यांना ग्लेन मॅग्राची उपाधी देण्यात आली होती. त्यामुळेच मुंबईकडून खेळत असतानाच त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरही निवड झाली होती. अविष्कार यांच्यानंतर आता ओंकार यांचे नाव चर्चेत आले आहे. ओंकार यांनी वर्षभर मुंबईच्या खेळाडूंवर चांगली मेहनत घेतली. रणनिती आखल्या गेल्या आणि अजिंक्यसारखा अनुभवी कर्णधार त्यांनी निवडला. सुरुवातीला अजिंक्यला कर्णधार करण्यावरून बरीच टीका झाली. पण त्यावेळी ओंकार यांचा निर्णय कसा योग्य होता, हे आता समोर आले आहे.

रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे वाटत होते. पण मुंबईचा संघ हा हतबल झालेला पाहायला मिळाला नाही. ओंकार देखील यावेळी मुंबईच्या खेळाडूंच्या पाठिशी ठामपणे उभे होते. त्यामुळेच मुंबईच्या संघाला विजय मिळवता आला.

2024-03-14T12:00:05Z dg43tfdfdgfd