कोलकाता नाईट रायडर्सची सनरायझर्स हैदराबादवर मात, क्लासेनची झंझावती खेळी अपयशी

आज आयपीएल २०२४ चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळला गेला. आयपीएल २०२४च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चार धावांनी विजय मिळवला. शनिवारी झालेल्या सामन्यात संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० षटकांत नऊ गडी गमावून २०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पॅट कमिन्सच्या संघाला २० षटकांत सात गडी गमावून २०४ धावा करता आल्या. कोलकाताने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली.

या सामन्यात प्रथम खेळल्यानंतर केकेआरने आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीमुळे २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादची एकवेळची धावसंख्या १६ षटकांत केवळ १३३ धावा होती. शेवटच्या चार षटकांत हैदराबादला विजयासाठी सुमारे २० च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. तरीही, हेनरिक क्लासेनने हार मानली नाही आणि एकट्याने संपूर्ण सामना फिरवला. हैदराबादला शेवटच्या पाच चेंडूत केवळ सात धावा करायच्या होत्या, पण शाहबाज आणि क्लासेन बाद झाले. हेनरिक क्लासेनने २९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्टने कोलकाता नाईट रायडर्सकडून ५४ धावा केल्या. यानंतर, आंद्रे रसेलच्या २५ चेंडूत नाबाद ६४ धावांच्या तुफानी खेळीमुळे केकेआरने सामन्यातील संथ सुरुवातीपासून सावरले आणि मोठी धावसंख्या फलकावर लावली. तर रिंकू सिंगने १५ चेंडूंत तीन चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले. केकेआरने शेवटच्या पाच षटकांत ८५ धावांची भर घातल्याने रसेल आणि रिंकू सिंग यांनी ३३ चेंडूंत ८१ धावांची भागीदारी केली. रसेलने या खेळीत ३ चौकार आणि ७ षटकार मारले. रमणदीप सिंगने ३५ धावांचे योगदान दिले. तर टी नटराजनने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी ३२-३२ धावा केल्या. शाहबाज अहमदने ५ चेंडूत १६ धावांचे योगदान दिले. तर हर्षित राणाने ३ बळी घेतले.

2024-03-23T18:08:15Z dg43tfdfdgfd