काहींना दुखापत तर काही राष्ट्रीय संघाचा भाग, 'हे' मोठे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

आयपीएलच्या १७व्या आवृत्तीला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. ज्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स आमनेसामने असतील. लीगमध्ये सामील असलेल्या १० संघांना पुन्हा एकदा एकमेकांना पराभूत करून चमकदार ट्रॉफी जिंकायची आहे, परंतु सध्या काही खेळाडू असे आहेत जे दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे खेळण्याच्या स्थितीत नाहीत. जाणून घ्या या खेळाडूंविषयी...

१. केएल राहुल

केएल राहुल भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळताना दिसला होता. मागील वर्षी राहुल आयपीएल हंगामात झालेल्या दुखापतीमुळे सर्व सामने खेळू शकला नाही. आता आयपीएल २०२४ च्या आधी दुखापतीमुळे त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. राहुल लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद भूषवणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत अजूनही साशंकता आहे.

२. राशिद खान

राशिद खानला पाठीच्या दुखापतीने बराच काळ ग्रासलं आहे. त्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि सध्या तो पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. या दुखापतीमुळे रशीद खान आतापर्यंत बीबीएल २०२३ आणि पीएसएलला मुकला आहे. अशा परिस्थितीत राशिद आयपीएल २०२४ मध्ये खेळणार का, असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रशीद लवकरच गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे, पण त्याची तब्येत लक्षात घेता त्याला पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर ठेवले जाऊ शकते.

३. मथिश पाथिराणा

आयपीएल २०२३ मध्ये आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर सीएसकेकडून १९ विकेट घेणारा श्रीलंकेचा गोलंदाज मथिश पाथिरानाला अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यात दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. एखाद्या खेळाडूला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी १ ते २ आठवडे लागू शकतात. यामुळे, पहिल्या काही सामन्यांसाठी पाथिरानाला सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे.

४. डेव्हन कॉनवे

२०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. गेल्या मोसमात त्याने १६ सामन्यांमध्ये ६७२ धावा केल्या होत्या. मात्र गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला काही आठवडे लागू शकतात. त्यामुळे कॉनवे आयपीएल २०२४ च्या अनेक सामन्यांमधून गायब राहू शकतो.

५. सूर्यकुमार यादव

काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. त्याला हर्नियाच्या समस्येने ग्रासले असून त्यासाठी जानेवारीमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. सूर्यकुमार सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. असे म्हटले जात आहे की तो लवकरच पुनरागमन करताना दिसणार आहे. परंतु तो विशेष फलंदाजीचा सराव करताना दिसला नाही. पहिल्या २ किंवा ३ सामन्यांसाठी तो मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर पडण्याचीही शक्यता आहे.

६. मॅथ्यू वेड

मॅथ्यू वेड हा आयपीएल २०२२ मधील चॅम्पियन संघ गुजरात टायटन्सचा अविभाज्य भाग होता. परंतु तो शेवटच्या हंगामात खेळू शकला नाही. वेडने काही दिवसांपूर्वी विधान केले होते की २१ ते २५ मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या शेफिल्ड शिल्ड लीगच्या अंतिम सामन्यात तो तस्मानियाकडून खेळणार आहे. अशा स्थितीत वेड गुजरात टायटन्सच्या पहिल्या एक-दोन सामन्यांतून बाहेर राहू शकतो.

2024-03-12T14:09:59Z dg43tfdfdgfd