कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : भारताचे विदीत, प्रज्ञानंद विजयी मार्गावर

टोरांटो : भारताच्या विदीत गुजराती आणि आर. प्रज्ञानंदने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान राखले. त्याच वेळी डी. गुकेशने स्पर्धेतील संयुक्त आघाडी कायम राखली. महिलांच्या स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि आर. वैशालीला हार पत्करावी लागली.

भारतीयांसाठी बुधवारी मध्यरात्री झालेली सहावी फेरी नक्कीच सुखावणारी होती. अवघ्या २४ तासांपूर्वी विदीत आणि प्रज्ञानंदला चांगल्या स्थितीनंतर बरोबरीवर समाधान मानावे लागले होते; पण त्याची भरपाई त्यांनी सहाव्या फेरीत केली. विदीतने अलीरेझा फिरौझाची अपयशी मालिका कायम राखली. प्रज्ञानंदने निजात अबसोव याला पराभूत केले. गुकेशने नाकामुराचा भक्कम बचाव भेदण्याचे केलेले प्रयत्न कमी पडले आणि दोघांनी बरोबरी मान्य केली. गुकेश आणि इयान नेपोमिनिशीची संयुक्त आघाडी कायम आहे. प्रज्ञानंदने संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला आहे. महिलांच्या स्पर्धेत हम्पीने लेई तिंगजिएविरुद्धची लढत ४८ चालींत गमावली. वैशाली कॅटेरिना लाग्नोविरुद्ध पराभूत झाली.

विदीतने कोणतीही घाई न करता आपली बाजू भक्कम केली. पटाच्या मध्यभागी असलेली प्यादी सुरुवातीस सक्रीय केलेल्या विदीतने अश्वाच्या मोबदल्यात हत्ती जिंकला. त्याचे एक प्यादे सातव्या घरात होते. अन्य तीन प्यादीही वजीर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत होती. हे पाहून फिरौझाने ४०व्या चालीत हार मान्य केली. विदीत गुजरातीने यावेळी सांगितले की, " दोन पराभव आणि विजयाची संधी दवडली असली, तरी माझ्या टीमने काय साध्य केले ते मला दाखवून दिले. त्यामुळेच आत्मविश्वास उंचावला होता. प्रतिस्पर्ध्याने वेगवान सुरुवात केल्यावरही त्याचे दडपण आले नाही. प्रत्येक आव्हानास तयार होतो. त्याचा फायदा झाला."

अबासोवने डावाच्या अंतिम टप्प्यात केलेल्या चुकीचा प्रज्ञानंदने फायदा घेतले. अर्थात, सुरुवातीपासून पारडे जड असल्याचा त्याला फायदा झाला. प्रज्ञानंदने प्रतिस्पर्ध्याला हत्तीच्या मदतीने प्यादे जिंकण्यास भाग पाडले. त्याचा फायदा घेऊन प्रज्ञानंदने अबासोवचे वजीराच्याबाजूकडील अखेरचे प्यादे जिंकले. त्यापूर्वी त्याने अश्व मोक्याच्या ठिकाणी ठेवले होते. त्याचाही त्याला फायदा झाला. सेमी ताराश बचावात्मक पद्धतीने झालेली ही लढत प्रज्ञानंदने ४५ चालीत जिंकली. आर. प्रज्ञानंद म्हणाला की, " सर्व काही सुरळीतपणे घडावे यासाठीच माझा प्रयत्न करतो; पण खेळाची वेळेशी सांगड घालण्याचा प्रश्न का येत आहे, हेच कळत नाही. त्यामुळे लढती रंगतदार होत आहेत. या सामन्यातही काही चुकीच्या चाली टाळणे शक्य होते."

गुकेश आणि हिकारू नाकामुरा यांच्यातील लढत बुद्धिबळ अभ्यासकांसाठी पर्वणी होती. प्रतिस्पर्ध्यांनी पर्यायापैकी सर्वोत्तम चाल ९८ टक्के वेळा केली. अखेर दोघांनी ४० चालींनंतर गुण वाटून घेण्याचे ठरवले. भारताचा गुकेश म्हणाला की, " पांढरी मोहरे असल्यामुळे मोहरामोहरीसाठी तयार नव्हतो; पण पर्याय नव्हता. डावातील स्थिती लक्षात घेतल्यास बरोबरीवर समाधान मानणे भाग पडले. या स्पर्धेत आत्तापर्यंत चांगला खेळ केला आहे; पण अजून खूप लढती शिल्लक आहेत."

सातव्या फेरीतील महत्त्वाचे मुद्दे

- गुकेश आणि नेपोमिनिशी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्त आघाडीवर

- प्रज्ञानंद आणि कॅरुआना प्रत्येकी ३.५ गुणांसह संयुक्त तिसरे. विदीत आणि नाकामुराचे प्रत्येकी तीन गुण.

- पुरुषांच्या स्पर्धेतील चारपैकी दोन लढती निकाली

- महिलांच्या स्पर्धेत वैशाली २.५ गुणांसह संयुक्त पाचवी, तर कोनेरू हम्पी दोन गुणांसह संयुक्त सातवी.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-12T13:42:56Z dg43tfdfdgfd